बेळगाव ः महापालिका आणि रहदारी पोलिसांकडून गणपत गल्ली, मारुती गल्ली परिसरात राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी मला सांगूनच आपल्या प्रभागात कारवाई करावी. लोक आम्हाला विचारत आहेत, असा अजब दावा केला. त्यामुळे अखेर ही मोहीम आवरती घेतली. पुढील कार्यवाहीबाबत बुधवारी (दि. 7) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिका आणि रहदारी पोलिसांनी सोमवारी (दि. 5) गणपत गल्ली परिसरात अतिक्रमण हटवले. रस्त्यात आलेले फलक, साहित्य महापालिकेने जप्त केले. पण ही कारवाई संपण्याआधीच रस्त्यात पुन्हा अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे पोलिस आणि महापालिकेने आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. पण यावेळी मात्र नगरसेवक सवदत्ती यांनी यामध्ये हस्तक्षेप केला.
मला न विचारता या भागात अतिक्रमण कसे हटवला. लोक मला विचारत आहेत. मला सांगितल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नका, असे त्यांनी महापालिकेच्या कर्मचार्यांना सांगितले.
एसीपी जोतिबा निकम यांनी यावेळी लोकांसाठीच अतिक्रमण दूर करण्यात येत आहे. जर तुम्हाला अतिक्रमण हटवायचे नसेल तर सांगा, त्यावर आम्ही निर्णय घेवू असे सांगितले. यावेळी काही व्यापार्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या निर्णयानुसार दुकानांचे जप्स काढू नयेत. आरेखनच्या आत असलेल्या व्यापार्यांवर कारवाई करू नये, असे सांगितले. अखेर याविषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी दुपारी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.