सहकार नेते रावसाहेब पाटील यांचे निधन  Pudhari File Photo
बेळगाव

सहकार नेते रावसाहेब पाटील कालवश

द. भा. जैन सभेचे अध्यक्ष, अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक निवर्तले

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव, निपाणी : सहकार रत्न, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक, अनेकांचे मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सहकाररत्न रावसाहेब पाटील ऊर्फ दादा (वय 83) यांचे मंगळवारी (25 जून) सकाळी 10.40 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सहकार श्रेत्रावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी मूळगावी बोरगाव येथे अंत्यसंस्कार पार पडले. आजी, माजी आमदार, खासदारांसह बेळगाव, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व स्तरातील नेत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना कर्नाटक सरकारचा ‘सहकार रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. सर्वसामान्यांमध्ये दादा म्हणून ख्याती असलेल्या रावसाहेब पाटील यांची 20 दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते, पण त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावली. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी, पुत्र अभिनंदन पाटील आणि युवानेते उत्तम पाटील, मुलगी दीपाली, सुना विनयश्री व धनश्री, भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जिल्ह्यावर शोककळा

बोरगाव हे जन्मस्थळ आणि कार्यक्षेत्र असलेल्या रावसाहेब पाटील यांचा जन्म अण्णासाहेब व सुमती यांच्या पोटी झाला. त्यांना आपल्या घरातूनच सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. बोरगाव नगरीचा गेल्या 55 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिल्यानंतर हा भाग मागासलेला आणि दुर्लक्षित होता. या भागाचे नंदनवन व्हावे आणि धार्मिक कार्याला सहकार आणि सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी रावसाहेब पाटील यांनी अथक प्रयत्न केले. अरिहंत पतससंस्था आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना जगण्याचा आधार दिला. शेतकर्‍यांच्या जीवनात संजीवनी आणण्याबरोबरच त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, यासाठी बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहाची स्थापना केली. आयुष्यभर कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा न करता त्यांनी काम केले. बोरगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक संघ-संस्थांची स्थापना केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT