बेळगाव : कर्नाटक राज्य अमली पदार्थमुक्त करण्याचे ध्येय पोलिस खात्याने ठेवले आहे. याला प्रत्येकाने हातभार लावला तरच हे साध्य आहे. त्यामुळे, तुमच्या परिसरात कुठे अमली पदार्थाचे सेवन, विक्री असे प्रकार सुरु असतील तर त्याची माहिती तातडीने नजिकच्या पोलिस ठाण्याला कळवा, असे आवाहन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
अमली पदार्थांच्या आहारी जाऊन तरुणाई व्यसनाधीन बनत आहे. हा प्रश्न फक्त बेळगावचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. यासाठी ड्रग्जमुक्त कर्नाटक आपले सर्वांचे ध्येय, हे ब्रीदवाक्य घेऊन पोलिस खाते कामाला लागले आहे. यासाठी केएसपी मोबाईल ॲप तयार केले आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेही अमली पदार्थांची विक्री, सेवन अथवा अशा काही संशयास्पद घडामोडी दिसून आल्या तर तुम्ही तातडीने याची माहिती नजिकच्या पोलिस ठाण्याला कळवा अथवा या ॲपवर माहिती अपलोड करा. जेणेकरुन पोलिसांना त्या टोळीपर्यंत पोचणे सोपे जाईल. तुमचे सहकार्य हीच आमची शक्ती आहे. त्यामुळे, सुरक्षित समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊ या, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.
तुम्हाला एखाद्या घटनेबाबत माहिती द्यायची असेल तर याचा सर्व तपशील ॲपमध्ये भरावा लागतो. उदा. तुमचा जिल्हा, तुमचे पोलिस ठाणे, कोणत्या प्रकारच्या अमली पदार्थाची विक्री अथवा नशा केली जाण्याचा संशय आहे, संशयिताचे नाव माहिती असल्यास त्याचा उल्लेख, संबंधित प्रकार सुरु असलेला परिसर असा सर्व उल्लेख करुन हे पेज सबमीट केल्यास स्थानिक पोलिसांना तसेच आयुक्तालयाला याची माहिती मिळते. यानंतर पोलिसांना कारवाई करणे सोपे होते.