Kognoli Accident News | चालकाच्या निष्काळजीपणामुळे कंटेनरची दुभाजकाला धडक Pudhari Photo
बेळगाव

Kognoli Accident News | चालकाच्या निष्काळजीपणामुळे कंटेनरची दुभाजकाला धडक

बॅटरीतून स्पार्क उडाल्याने डिझेल टाकीचा स्फोट : कंटेनर केबिनसह नाक्यावरील बुथ खाक

पुढारी वृत्तसेवा

Kognoli Accident News

निपाणी : कोगनोळी टोल नाका येथे बुधवारी रात्री भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टोलवर पावती काढण्यासाठी थांबलेल्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुभाजकाला धडकला. यावेळी बॅटरीतून स्पार्क उडून डिझेल टाकीचा स्फोट होवून ट्रक केबिनसह जळून खाक झाल्याने सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. याबाबत ट्रकचालकाविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकरन जे. जयरामण (वय ३६ रा. निलमंगल, तामिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, ट्रकचालक प्रभाकरन हा दावणगिरी येथून कंटेनरमधून २७ टन तांदूळ भरून मुंबईकडे जात होता. दरम्यान, हा कंटेनर टोल नाक्याजवळ आला असता चालकाचा ताबा सुटला. यावेळी दोन नंबर लेनवर दुसरा ट्रक पावती करण्यासाठी थांबला होता. दरम्यान कंटेनर चालक प्रभाकरन याचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर बंद असलेल्या एक नंबर लेनमध्ये घुसला. यावेळी कंटेनरची दुभाजकाला धडक बसली. त्यामुळे बॅटरीतून स्पार्क होऊन डिझेल टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रकच्या पुढील बाजूने पेट घेऊन आग भडकली.

यावेळी कंटेनरच्या केबिनसह बुथ नंबर दोनला आगीने कवेत घेतले. यावेळी प्रसंगावधान राखून चालक प्रभाकरन व क्लीनर अलीगोयन व टोलवरील बुथ नं. दोन मधील कर्मचारी अभिषेक यांनी प्रसंगावधान राखीत पळ काढला. घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांसह अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी तातडीने पोलीस प्रशासनासह अग्निशमन दल दाखल झाले. मात्र तत्पूर्वीच या आगीत ट्रक केबिनसह टोल नाक्यावरील केबिनसह संगणक आदी साहित्य जळून खाक झाल्याने शिवाय बूथच्या शेडला आगीची झळ बसल्याने सुमारे १० लाखांचे नुकसान झाले.

यावेळी विस्कळीत झालेली वाहतूक रस्ते देखभाल भरारी पथकासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली. या घटनेबाबत कंटेनर चालक प्रभाकरन याच्या विरोधात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया टोलनाक्याचे मॅनेजर भिमशेट्टी विश्वनाथ पाटील यांनी रितसर फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास चालवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT