बेळगाव : तीनवेळा सांगूनही चर्चेत सहभागी न होता आपापसात बोलणार्या तीन अभियंत्यांना अखेर अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी बाहेर जाण्यास सांगितले. तत्पूर्वी, त्यांना चांगलेच खडसावले. मंगळवारी (दि. 7) झालेल्या महापालिका बांधकाम स्थायी समितीची बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीत प्रामुख्याने बंद पडलेले पथदीप आणि स्मशानभूमी दुरुस्तीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकार्यांच्या कामकाजावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी बंद पडलेल्या पथदिपांचा मुद्दा उपस्थित केला. सणांच्या काळात लोकांच्या सोयीसाठी शिवाजीनगरमध्ये दोन पथदीप लावण्यास सांगितले होते. पण, त्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही, असे सांगून त्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. त्यावर बोलताना इलेक्ट्रिक अभियंता आनंद देशपांडे यांनी शहरात नव्याने तीन हजारांहून अधिक पथदीप उभारणार असल्याची माहिती दिली. नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी शहापूर स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा विषय मांडला. याआधी झालेल्या सर्वच बैठकांमध्ये स्मशानभूमी स्वच्छतेबाबत अधिकार्यांना सूचना केल्या होत्या. पण, शहापूर स्मशानभूमीची स्वच्छता झालेली नाही. सदाशिवनगर स्मशानभूमीत रखडलेले काम अद्याप सुरु केले नसल्याचे सांगितले.
सर्व सफाई कामगारांना हिवाळी अधिवेशनासाठी नेमण्यात आले होते. त्यानंतर आता ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे काम सुरु असल्याने कामगारांची टंचाई भासत आहे. लवकरच स्मशानभूमी स्वच्छता म्हणून हाती घेण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले. त्यानंतर बांधकाम परवाना शुल्क वाढविणे, समुदाय भवन भाडेवाढ करणे, शहापूर मुख्य रस्ता व खासबाग बसवेश्वर चौकात पथदीप उभारणे, दुसर्या रेल्वे फाटकावर सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करणे, यरमाळ तलावाचे पुनर्भरण करणे, हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करणे, गणपत गल्ली रस्त्याचे काम करणे आदी 16 विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठक सुरू असतानाच बांधकाम विभागाच्या तीन साहाय्यक अभियंते आपसात बोलत होत्या. त्याबाबत अधीक्षक अभियंता निपाणीकर यांनी तीनवेळा सूचना करुनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे, संतापलेल्या निपाणीकर यांनी त्यांना खडे बोल सुनावून बैठकीतून बाहेर काढले. बैठकीला सदस्य अभिजीत जवळकर, उदयकुमार उपरी, बसवराज मोदगेकर, कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी, अभियंते सचिन कांबळे, अभियंते सिद्धगौडा आदी उपस्थित होते.
बैठक सुरु असतानाच पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी फोनवर बोलत होते. त्यामुळे, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे, एकूण चार अभियंत्यांना बैठकीतून बाहेर जावे लागले.