बेळगाव : देशाच्या हितासाठी शहीद होणार्यांची आमची परंपरा आहे. माफी मागणार्यांची नाही. आमची वाटचाल सत्याच्या विचारधारेवर आहे. सरकार संविधान, आरक्षण संपवू पाहत आहे. संविधान हे दलित, महिला, गरीब सर्वांचेच रक्षा करत आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी बलिदान देण्यासाठीही आम्ही सज्ज आहोत, अशा शब्दांत खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डॉ. आंबेडकरांचा अपमान करत आहेत. उद्योजकांच्या आडून सरकार लोकांना गरिबीच्या खाईत लोटत आहेत. याविरोधात आवाज उठविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन करत काँग्रेसच्या जय बापू, जय भीम, जय संविधान या देशव्यापी आंदोलनाला चालना दिली. काँग्रेसकडून मंगळवारी (दि. 21) सीपीएड मैदानावर जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार गांधींसह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला.
त्या पुढे म्हणाल्या, बसवण्णा यांच्या अनुभव मंडपावर लोकशाही टिकून आहे; पण संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याची लढाई सुरू असताना एका बाजूला वेगळीच विचारधारा जन्माला येत होती. त्यांचा समानतेला विरोध आहे. संविधानाला विरोध आहे. आजवर अनेक साम्राज्ये रक्तपात, हिंसा करून उलथवून टाकण्यात आली. पण, आमचा लढा अहिंसेवर, सत्यावर आधारित होता. जगाच्या पाठीवर असा लढा कुठेही झाला नाही. याच सत्य, अहिंसेवर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे संविधान हे केवळ पुस्तक नाही तर महिला, दलित, सामान्य जनतेचे सुरक्षा कवच असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही वाचविण्याची ताकद संविधानात आहे. न्याय मागण्याचा अधिकार आहे. डॉ. आंबेडकरांमुळे हा अधिकार सर्वांना मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या अनेक सरकारांनी कधीही संविधान आणि डॉ. आंबेडकरांना विरोध केला नव्हता; पण आताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. आंबेडकरांचा अपमान केला. त्यांचे मंत्री संविधान बदण्याची भाषा करतात. त्यांचे लोक 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते, असे सांगतात. हा लोकशाही, संविधानाचा घोर अपमान आहे. देशाच्या विविधतेवर हल्ले करण्यात येत आहेत. तिरंग्याचा अपमान होत आहे. खासगीकरणाच्या आडून आरक्षण संपविण्यात येत आहे. न्यायपालिका कमजोर करण्यात येत आहे. कामगार कायदे, लोकपाल विधेयक कमजोर करण्यात आले आहे. सहाशेहून अधिक शेतकरी शहीद झाल्यानंतर सरकारने काळे कायदे मागे घेतले. सरकारची प्रत्येक कृती संविधानविरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला.
उद्योगपती अदानी, अंबानी यांच्याकडेच देशातील सर्व संपत्ती देण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात संसदेत खासदार राहुल गांधी आवाज उठवताच माईक बंद केला जातो. पेट्रोलपासून मुलांच्या पोशाखापर्यंत, शेतकर्यांच्या अवजारांवर जीएसटी लावला जातो. शेतकरी चारही बाजूंनी संकटात आहेत. ते आत्महत्या करत आहेत. कर्जाच्या खाईत सापडले आहेत. दुसरीकडे सरकारने मूठभर उद्योजकांचे तब्बल 47 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. सामान्य जनतेची पिळवणूक सुरू आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण बंद करण्यात येत आहे. सरकार संविधानविरोधी कृती करत आहे. त्यामुळे, संविधानाला विरोध करणार्यांच्या पाठीशी थांबणार नाही, असा प्रत्येकाने संकल्प करावा. आज भाजप आणि आरएसएस राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस घालून अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आमची शहिदांची परंपरा आहे. संविधान रक्षणासाठी प्रसंगी बलिदान देण्याचीही तयारी आहे, असे खासदार गांधी यांनी निक्षून सांगितले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, खासदार रणदीपसिंग सूरजेवाला आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्यातील सर्व मंत्री, खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज महिलांच्या सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात; पण डॉ. आंबेडकरांनी अनेक वर्षांपूर्वीच हा विचार मांडला होता. त्यावेळी काहींनी बाबासाहेबांचे पुतळे जाळले होते. देशात महिलांवर अत्याचार करणार्यांच्या पाठीशी भाजप सरकार थांबत आहे. संविधानाचा राजरोसपणे अपमान होत राहिल्यामुळेच भाजपला लोकसभेत चांगलाच धडा मिळाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानासमोर नतमस्तक व्हावे लागले; पण हा लढा संपलेला नाही, असे खासदार गांधी यांनी स्पष्ट केले.