निपाणी : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मागील कार्यकाळात 169 कोटी रूपये खर्च करून जातनिहाय गणतीचे काम कांतराज आयोगाद्वारे पुर्ण केले. मात्र हा अहवाल अवैज्ञानिक असल्याची टीका विरोधी भाजपने केली आहे.
त्यामुळे सरकारने हा अहवाल तात्काळ जनतेसमोर खुला करावा तसेच अहवालावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी बुडा तसेच चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी पत्रकार बैठकीत केली. स्वागत नगरसेवक जरारखान पठाण यांनी केले.
चिंगळे म्हणाले, हा अहवाल तयार करत असताना 1 लाख 64 हजार कर्मचार्यांची मदत घेण्यात आली. यामधून सर्व जातींमधील कुटुंबांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यात आली. शहरी भागात 96 टक्के तर ग्रामीण भागातील 94 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यामध्ये 400 जातींचे सर्वेक्षण झाले. या अहवालासंदर्भात दोनवेळा मंत्रिमंडळात चर्चा झाल्या. पण, जनतेपर्यंत हा अहवाल पोहोचलेला नाही.
कोणत्या राज्यात किती समाजाची संख्या आहे. त्या समाजाला शासकीय योजनाचा लाभ देता येणे शक्य व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जातनिहाय जनगणनेचे आदेश दिले होते. विरोधी पक्षाने सदर अहवाल रद्द करून पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. मात्र हा खर्च अधिक आहे. या अहवालावर चर्चेसाठी सरकारने 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे.
यावेळी निपाणी ब्लॉक कॉग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकू पाटील, राज पठाण, नगरसेवक अॅड. संजय चव्हाण, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, प्रतीक शहा, सुशांत खराडे, अब्बास फरास, प्रशांत हंडोरी, बाळासाहेब कमते,अवधूत गुरव आदी उपस्थित होते.