Cylinder blast compensation: File
बेळगाव

Cylinder blast compensation: सिलिंडर स्फोटासाठीही मिळते भरपाई

बहुसंख्य अनभिज्ञ : जनजागृतीच्या अभावामुळे भरपाईपासून वंचित

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर त्याबदल्यात नुकसान भरपाई मिळते. जीवितहानी झाली, कुणी जखमी झाले वा इमारतीचे नुकसान झाल्यानंतर संबंधित ग्राहकाला भरपाई मिळते. मात्र, याबाबत पुरेशी जनजागृती झाली नसल्याने अनेकजण या भरपाईपासून वंचित राहत आहेत. जिल्हा प्रशासन, गॅस कंपन्या तसेच जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाने याबाबत जागृती करावी, अशी मागणी होत आहे.

घरगुती गॅस कंपन्या दरवर्षी ग्राहक संरक्षणासाठी सुमारे 40 कोटी रुपयांचा विमा भरत असतात. गॅस सिलिंडरमुळे ग्राहकाची कोणत्याही प्रकारे हानी झाली तर नुकसानभरपाई मिळावी हाच यामागचा उद्देश आहे. बऱ्याचदा गॅस गळतीमुळे स्फोट होतो. त्यात काहींचा मृत्यू होतो तर अनेकजण जखमी होतात. शिवाय इमारत व घरातील साहित्याचे नुकसान होते. अशी घटना घडल्यानंतर संबंधित ग्राहकाला नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, याबाबतची माहिती नसल्याने नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहतो.

स्फोट झाल्यानंतर भरपाई मिळवायची असेल तर प्रथम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली पाहिजे. त्यानंतर पोलिस घटनेचा पंचनामा करुन त्याचा अहवाल तयार करतात. त्यानुसार ग्राहकाला न्यायालयात धाव घ्यावी लागते. दावा दाखल केल्यानंतर न्यायालय विमा कंपनी व वादी यांचे म्हणणे ऐकून निकाल देते. गॅस सिलेंडर कंपन्यांकडून भरलेल्या संरक्षण विम्याच्या रकमेतून न्यायालय संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई मंजूर करते. मात्र, बरेच ग्राहक सदर प्रक्रिया ही किचकट असल्याचे समजून न्यायालयात जाण्याचे टाळतात. उलट ही प्रक्रिया अत्यंत सुलभ असून एखाद्या वकिलाकडून आपण न्यायालयात अर्ज दाखल करुन भरपाई मिळवू शकतो. त्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे.

महत्त्वाचे म्हणजे गॅस कंपन्या विमा म्हणून जी रक्कम भरतात ती ग्राहकाचीच असते. आपण सिलेंडर खरेदी करताना जी रक्कम देतो त्यातूनच कंपन्या विमा भरत असतात. त्यामुळे, मिळणारी भरपाई हक्काची असते, हे ग्राहकाने समजून घेणे गरजेचे आहे. दरवर्षी बेळगावसह जिल्ह्यात गॅस गळतीने स्फोट होणाऱ्या घटना घडत आहेत. या घटनेत मोठे नुकसान होत आहे. मात्र, नुकसान भरपाई मिळते याची माहिती ग्राहकांना नाही. त्यामुळे, जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाने यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे.

गॅस गळती स्फोटाच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशा घटनांत जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होते. अशा गंभीर घटना घडल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाते. संबंधित गॅस कंपनीच्या विरोधात आपण दावा दाखल केला पाहिजे. त्यानंतर निश्चित भरपाई मिळते. त्यासाठी ग्राहकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
- ॲड. एन. आर. लातूर, वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT