बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांच्या घरामध्ये निम्मे पाकिस्तान असल्याचे वादग्रस्त विधान करणारे विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना विनाजामीन अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. याविरुद्ध गुंडुराव यांनी लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती. बुधवारी (दि. 16) आ. यत्नाळ यांना स्वत: न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. पण, ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विनाजामीन अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
विश्वेश्वर कॅफेमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणी 6 एप्रिल रोजी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या घरात निम्मे पाकिस्तान असल्याचा आरोप केला होता. देशविरोधी विधान केल्याचा आरोप करून गुंडुराव यांच्या पत्नी टबू राव यांनी न्यायालयात तक्रार केली होती. पती दिनेश गुंडुराव व आपल्या कुटुंबीयांविरुद्ध आ. यत्नाळ यांनी अपमानास्पद विधान केल्याचे त्यांनी म्हटले होते. भाजपच्या सोशल मीडिया सेलविरुद्ध त्यांनी राज्य महिला आयोगाकडे अब्रुनुकसानीचा दावा केला होता. 29 ऑगस्ट रोजी न्यायालयाने दावा दाखल करुन घेतला. 16 ऑक्टोबरला आ. यत्नाळ यांना हजर राहण्याचा आदेश दिला होता.