बेळगाव ः ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या बेळगावच्या स्नुषा कर्नल सोफिया कुरेशी यांचे देशभर नाव गाजत आहे. परंतु, काही समाजकंटकांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याच्या हेतूने गोकाकमधील त्यांच्या घरावर हल्ला झाल्याचे खोटे वृत्त सोशल मीडियावर पसरविले. याप्रकरणी जिल्हा सीईएन विभागाने तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनीसउद्दिन, खुबानी व डॉ. रुमी या तिघा अनोळखींविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे तिघे ट्विटर हँडलर आहेत. याप्रकरणी मुक्काण्णा देवाप्पा बेलूर या पोलिस अधिकार्याने दिलेल्या सुओ-मोटो फिर्यादीनुसार याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिस मुख्यालयामार्फत सोशल मीडिया तपासत असताना 13 मे रोजी एक ट्विटर संदेश आढळून आला. अनीसउद्दिन नामक व्यक्तीने त्याच्या ट्विटर खात्यावरून 13 मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास ब्रेकिंग न्यूज असे म्हणत एक मेसेज व्हायरल केला. आरएसएसने कर्नल कुरेशी यांचा निषेध करत त्यांच्या बेळगाव जिल्ह्यातील घरावर हल्ला चढविला. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून त्यात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांची मुलगी दिल्लीत असल्याने वाचली आहे.
हल्लेखोरांनी घराला आग लावत हिंदूत्वपर घोषणा दिल्याचेही या खोट्या बातमीत नमूद केले आहे. याशिवाय अनेक आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख या खोट्या बातमीत असून या कुटुंबाला सध्या दिल्लीला हलवल्याचे सुत्रांकडून समजत असल्याचेही नमूद आहे. 13 मे रोजीचे हेच वृत्त पुढे खुबानी व डॉ. रुमी या दोघा अनोळखींनीही त्यांच्या ट्विटर खात्यावरून 14 मे रोजी ट्विट केले आहे.
हा सर्व प्रकार दोन धर्मांमध्ये तणाव व तेढ निर्माण करणारा आहे. त्यामुळे, या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद गुरुवारी दाखल करुन घेतली आहे. खोटी बातमी पसरविणारा मुख्य संशयित अनीसउद्दिन व त्याचे ट्विट पुढे शेअर करणारे अन्य दोघे कोण आहेत, याचा शोध सुरु असल्याचे सीईएनच्या अधिकार्यांनी सांगितले.
सोशल मीडिया पाहणार्यांना हे वृत्त खरे वाटावे, यासाठी संशयिताने एका खोलीत टेबल, खुर्च्या फोडलेले, अन्य साहित्य इतस्ततः विखुरलेले छायाचित्र वृत्ताला जोडले आहे. शिवाय वरच्या बाजूला कोपर्यात कर्नल कुरेशी यांचे छायात्रिही जोडले असल्याचे दिसून येते. त्याच्या या अतिआगाऊपणामुळे पोलिस खात्यासह समाजातही प्रचंड संताप व्यक्त होत आहे.