‘ऑपरेशन सिंदूर’ची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देणार्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सूनबाई आहेत. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा नकाशा व ‘ऑपरेशन सिंदूर’ची रणनीती अत्यंत स्पष्ट व आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने देशासमोर आणि जगासमोर सांगणार्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा तमाम बेळगावकरांना अभिमान आहे. गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावातील कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्या त्या पत्नी आहेत.
सोफिया यांनी 2015 मध्ये ताजुद्दीन यांच्याशी प्रेमविवाह केला. त्या मूळच्या बडोद्यातील (गुजरात) असून, पती ताजुद्दीन भारतीय सैन्यात कर्नल पदावर झांशी येथे कार्यरत आहेत.
सोफिया लष्कराच्या संदेश वहन यंत्रणेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लष्कराच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या सोफिया सध्या बेळगावकरांसाठी अभिमान ठरल्या आहेत.
कोण्णूरमध्ये राहणारे सोफिया यांचे सासरे गौस बागेवाडी यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना हे सर्व पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगितले. सुनेने माझ्या गावाला व कर्नाटक राज्याला आदर मिळून दिला आहे. सून व मुलगा एकाच ठिकाणी काम करत होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी विवाह केला.
सोफिया कुरेशी 1999 मध्ये लष्करात दाखल झाल्या. लष्कराच्या फोर्स-18 च्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी अशियाई देशांमध्ये झालेल्या अनेक लष्करी कारवायांमध्ये भाग घेतलेला आहे. इतर देशांसोबत केलेल्या अनेक कवायतींमध्ये भाग घेतलेल्या त्या एकमेव महिला कमांडर आहेत. तसेच, भारतीय लष्करामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 2006 मध्ये कांगो येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
सोफिया कुरेशी यांच्या घराण्याला लष्कराची पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्करात होते. बंधू संजय कुरेशीही सैन्यात आहेत. आजोबा आणि वडील दोघांनीही सैन्य दलात सेवा बजावली आहे. वडिलांनी 1971 च्या युद्धात ईएमई तुकडीमार्फत बडोद्यातून सहभाग घेतला होता. वडिलांचे आजोबा (आईचे वडील) ब्रिटिश आर्मीमध्ये होते. त्यांनी नंतर 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. सोफिया यांचे कुटुंबीय बडोद्यात वास्तव्यास असते. त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण आहे.