बंगळूर : राज्यात सुरू असणारी शैक्षणिक आणि सामाजिक जातनिहाय जनगणना संथगतीने सुरू आहे. अडथळे दूर करून जनगणना पूर्ण झाली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यभरात सुरू असणारी जात जनगणना संथगतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जनगणनेत अनेक अडथळे येत असून, अपेक्षित गती नसल्याची टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी घेतली.
बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जनगणनेचा जिल्हानिहाय आढावा घेतला. अधिकार्यांनी दुर्लक्ष न करता जनगणना पूर्ण करावी. राज्य सरकारने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी योग्य कारणाशिवाय गैरहजर राहत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे बजावले.
राज्यभरात जनगणना सुरू केल्यानंतर पहिले काही दिवस तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. आता सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनगणनेचे काम गतीने पूर्ण करावे, यासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रयत्न करावेत. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्या तातडीने दूर कराव्यात.
जनगणनेसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षकांनी आपले काम पूर्ण करावे. हे सरकारी काम असून, त्याकडे दुर्लक्ष करणार्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. शिक्षकांना मानधन देण्यात येणार आहे. सध्या त्याला मंजुरी देण्यात आली असून, शिक्षकांनी याबाबत शंका बाळगू नये, असे त्यांनी बजावले.
ही जनगणना केवळ मागासगर्वीय खात्याची नसून यासाठी जिल्हाधिकारी आणि जि. पं. सीईओ यांनी रोज आढावा घेतला पाहिजे. महसूल खाते, पंचायत राज खाते, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून जनगणना तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना केली.
काही जिल्ह्यांतून संथगतीने सर्व्हे काम सुरू आहे. आवश्यक ठिकाणी अनुदानिक शाळांतील शिक्षकांची नेमणूक करावी. पालकमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा करावी. जिल्हास्तरीय अधिकार्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी. डोंगराळ भागात शाळांतून जनगणना केंद्र सुरू करण्याची तरतूद केली आहे. केंद्रावर लोकांनी येत जनगणनेसाठी आवश्यक सहकार्य करावे. ऑनलाईन नोंदणीची सोय केली आहे. बंद घरे असल्यास दुसर्या दिवशी त्याठिकाणी जाऊन जनगणना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
जनगणना 7 पर्यंत पूर्ण करा
राज्यात सध्या 2 लाख, 76 हजार, 16 कुटुंबांची जनगणना पूर्ण झाली आहे. 1 कोटी, 43 लाख, 81 हजार, 702 कुटुंबांचा सर्व्हे करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सर्व्हेसाठी 1 लाख, 20 हजार, 728 गणतीदारांची नेमणूक केली आहे. 1 लाख, 22 हजार, 85 ब्लॉक असून 7 ऑक्टोबरपर्यंत सर्व्हे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.