Viral infection: बदलत्या हवामानामुळे ‘व्हायरल’चा धोका pudhari photo
बेळगाव

Viral infection: बदलत्या हवामानामुळे ‘व्हायरल’चा धोका

ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत वाढ : आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपायांसाठी सज्ज

पुढारी वृत्तसेवा

अंकली : गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यांत साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात अस्वच्छता, दूषित अन्नपाणी, डास-कीटकांचा सुळसुळाट व बदलत्या हवामानामुळे आजार लवकर पसरतात. त्यातच पुरामुळेही परिस्थिती गंभीर झाली आहे. वेळीच पूर ओसरला आणि दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पण पाऊस सुरूच असल्याने ‘व्हायरल’चा दणका सुरु आहे. त्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहे.

डेंग्यू टाळण्यासाठी घराच्या खिडकीस जाळ्या, गटारी स्वच्छ करणे, साठलेले पाणी वाहते करणे, पाणी आठवड्यात एकवेळा पाण्याची भांडी स्वच्छ करणे, पूर्ण बाह्याचे कपडे घालणे, टॉयलेटच्या व्हेन्ट पाईपला जाळी लावणे, गप्पी मासे सोडणे, साठलेल्या पाण्यात जळके ऑईल टाकणे, साथीच्या ठिकाणी घरातून धूर फवारणी करणे आवश्यक ठरते.

कावीळ टाळण्यासाठी ग्रामपंचायत विभागातर्फे दैनंदिन टीसीएलद्वारे शुद्धीकरण, पाणी गाळून उकळून पिणे, वैयक्तिक स्वछता, हात स्वच्छ धुणे, गावातील पाणी टाकी महिन्यातून एकवेळ स्वच्छ धुणे, पाणीस्रोतामध्ये इतर दूषित पाणी मिसळू न देणे, परिसर स्वच्छता, गळती काढणे आवश्यक ठरते. ताप, डोळे व लघवीला पिवळे होणे, भूक न लागणे, मळमळ, पोटदुखी, उलटी ही काविळीची लक्षणे असून तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर पुरळ उठणे, तीव्र थकवा ही डेंग्यूची लक्षणे आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा साथीचे प्रमाण कमी आहे. पुरेसा औषध साठा, तपासणी व्यवस्था, दैनंदिन रिअल टाईम ऑनलाईन माहितीवर नियंत्रण व लक्ष ठेवून असल्याने आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आरोग्य विभाग साथीचे रोग प्रतिबंधासाठी आणि उपचारासाठीही सज्ज आहे. सध्या कृष्णा काठावर पूर येऊन गेल्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे गढूळ पाण्यामुळे कृष्णाकाठासह अनेक ठिकाणी सध्या कावीळ व डेंग्यूच्या आजाराची लक्षणे मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहेत. विशेष करून लहान मुलांमध्ये कावीळ मोठ्याप्रमाणात दिसून येऊ लागली आहे.

वेळेत औषधोपचार घेणे आवश्यक

सध्या वातावरणातील बदलामुळे फ्लूसदृश्य ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या ऊन-पाऊस खेळ सुरु असून आता पावसाळी वातावरण झाले आहे. त्यामुळे अंगात कणकण असेल तर थेट डॉक्टरांकडे जाणे हिताचे ठरते. वेळेत औषधोपचार घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT