Newborn Baby Pudhari
बेळगाव

Mother and Newborn Baby death: ‘सिव्हिल‌’ कधी बनणार दक्ष?

जिल्हा रुग्णालयात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेचा आणि तिच्या अर्भकाचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच एपीएमसी पोलिस स्थानकात डॉक्टरांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

इरम्मा नागप्पा मटोळी (वय 21, रा. हनशीकट्टी ता. कित्तूर) असे मृत महिलेचे नाव आहे. इरम्माला शुक्रवारी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिला जुलाबाचा त्रास चालू झाला. त्यामुळे प्रथम जुलाब कमी करण्यासाठी उपचार करून त्यानंतर प्रसूती करू, असे डॉक्टरांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी तिला अधिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना कल्पना देऊन उपचारांची मागणी केली. तरीही डॉक्टरांनी, ‌‘त्रास होणारच, थोडे सहन करा‌’ असे सांगितले. मात्र काही वेळातच तिची प्रकृती गंभीर बनल्याने डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया केली. मात्र त्यात इरम्मा आणि अर्भकाचाही मृत्यू झाला.

इरम्मा कंत्राटी पद्धतीने काही वर्ष जिल्हा रुग्णालयातच काम करत होती. लग्नानंतर तिने ते काम सोडले होते. मात्र प्रसूतीसाठी तिने सिव्हिलमध्येच दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि तिचा घात झाला, असे इरम्माच्या आईने सांगितले.

इरम्माला दाखल झालेल्या दिवसापासूनच जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यावर उपचार सुरू होते. मात्र अचानक रक्तदाब वाढला आणि तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला आणि अर्भकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्तदाब वाढल्यामुळे डॉक्टरही काहीच करू शकले नाहीत.
-डॉ. इराण्णा पल्लेद, अधीक्षक, बिम्स रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT