हिंडलगा : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर झाड कोसळून रहदारी विस्कळीत झाली होती. दुसर्‍या छायाचित्रात कॅम्पमधील मार्केटमध्ये कोसळलेले झाड.  pudhari photo
बेळगाव

शहर परिसराला वादळी पावसाचा तडाखा

ठिकठिकाणी झाडांची पडझड ः दुचाकीचे नुकसान, वीजपुरवठ्यासह रहदारी विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर परिसराला मंगळवारी (दि. 22) सायंकाळी वादळी पावसामुळे चांगलेच झोडपून काढले. जोरदार वार्‍यामुळे झाडे कोसळण्याचे प्रकार झाले. त्यामुळे, वीजवाहिन्या व खांबांचे नुकसान होऊन काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. हेस्कॉमच्या कर्मचार्‍यांनी तातडीने दुरुस्तीकाम हाती घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला.

बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर सुळगेजवळ (हिं.) झाड कोसळल्याने रहदारीची कोंडी झाली. झाड वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. झाड हटवेपर्यंत महामार्गावरील रहदारी विस्कळीत झाली होती. कॅम्पमधील मार्केट परिसरात झाड कोसळून एका दुचाकीचे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून या घटनेत जीवितहानी झाली नाही.

दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या सरी आल्या. अर्धा तास पाऊस झाला. पण, पावसापेक्षा वार्‍याचा जोर अधिक असल्याने ठिकठिकाणी झाडाचे फांद्या पडण्याचे प्रकार घडले. अनेक ठिकाणी फांद्या वीजवाहिन्यांवरत कोसळून संबंधित भागातील वीजपुरवठा ठप्प हो-ण्याचे प्रकार घडले. तीन ठिकाणी विजेच्या खांबांचेही नुकसान झाले. याची माहिती मिळाल्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वीजवाहिन्या बाजूला करुन वाहनांना वाट मोकळी करून दिली.

अवघ्या अर्ध्या तासात हेस्कॉमच्या कर्मचार्‍यांनी लोंबकळणार्‍या वीजवाहिन्या पूर्ववत करुन वीजपुरवठा सुरळीत केला. पावसाचे प्रमाण कमी आणि वादळाचे जास्त असल्याने रस्त्याकडेला बसलेल्या विक्रेत्यांचे साहित्य विखुरले गेले. एपीएमसी रोडसह उपनगरात काही दुकानाचे फलक दूरवर उडून गेल्याच्या घटना घडल्या. या अपघातात काही दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या.

हिंडलगा परिसराला झोडपले

हिंडलगा परिसराला मंगळवारी (दि.22) पावसाने झोडपले. वादळी पावसासह झालेल्या पावसाने सुमारे तासभर जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून हवेतील उष्मा वाढला होता. मंगळवारी सकाळपासून हवेत उष्मा होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरण ढगाळ होते. पावसामुळे मशागतीच्या कामांना पोषक वातावरण तयार झाले आहे.

हेस्कॉमचे आवाहन

वादळी वार्‍याने झाडे पडून दुर्घटना घडल्याची घटना घडल्यास लोकांनी तत्काळ साहाय्यक अभियंता (9480881997 व 9480881998) व कनिष्ठ अभियंता (9480882809 व 9480882310) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. वनखात्याच्या मदतीने तत्काळ मदत कार्य राबविले जाईल, असे आवाहन हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT