बेळगाव : गॅस गीझरचा स्फोट झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेतच. गॅस सिलिंडरचाही स्फोट होतो. मात्र फ्रीजचा स्फोट होण्याच्या घटना दुर्मीळ. तशीच घटना मंगळवारी पहाटे बेळगावात घडली. अशा स्फोटांपासून आणि शॉर्ट सर्किटपासून बचावासाठी सर्किट ब्रेकर हे उपकरण महत्त्वाचे असल्याचे वीज अभियंते सांगतात. चव्हाट गल्लीतील घराला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे. फ्रीजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग भडकल्याचे मानले जाते.
घर, दुकान किंवा कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आगी लागतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. वीज प्रवाहात अनपेक्षितपणे कमी प्रतिरोध निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात वीज वाहू लागते. त्यामुळे वायर गरम होऊन त्याचे आवरण वितळते आणि टीव्ही, एसी, पंखा, फ्रीज अशी उपकरणे जळतात. ज्या उपकरणांमध्ये वातानुकूलनासाठी वायू भरलेला असतो, अशा उपकरणांचा स्फोट होऊ शकतो. त्यातून आग लागण्याचा धोका निर्माण होतो.
घरातील विद्युत यंत्रणेत योग्य क्षमतेचे फ्यूज, सर्किट ब्रेकर तसेच आवश्यकतेनुसार आरसीसीबी बसविल्यास विद्युत दोषाच्या वेळी वीजपुरवठा आपोआप तातडीने खंडित होतो. वायरवरील लोड जेव्हा वाढतो, तेव्हा सर्किट ब्रेकर हे उपकरण आपोआप वीज खंडित करते. त्यामुळे मोठा टळू शकतो जुन्या किंवा खराब झालेल्या वायरिंगचा वापर, तकलादू वीजजोडणी, एकाच सॉकेटला अनेक उपकरणे जोडणे, क्षमतेपेक्षा जास्त भार वापरणे तसेच निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर ही शॉर्टसर्किटची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे घरातील वायरिंगची वेळोवेळी तपासणी करून खराब वायर, स्विच, प्लग व सॉकेट तातडीने बदलणे आवश्यक आहे, अशी माहितीही हेस्कॉम या वीज कंपनीच्या अभियंत्यांनी दिली.
काय करावे -
विजेची उपकरणे विनाकारण सुरू ठेवू नयेत.
हीटर, इस्त्री, गिझर, फ्रिज, एअर कंडिशनर यांसारख्या अधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांसाठी योग्य क्षमतेचे वायरिंग व स्वतंत्र सर्किट असणे आवश्यक आहे.
एकाच एक्स्टेंशन बोर्डवर अनेक जास्त क्षमतेची उपकरणे जोडणे टाळावे.
पावसाळ्यात ओलसर भिंती, पाणी लागलेले स्विच किंवा विद्युत उपकरणे हाताळणे टाळावे.
बिघाड झाल्यास स्वतः दुरुस्ती करण्यापेक्षा प्रशिक्षित विद्युत तंत्रज्ञाची मदत घ्यावी.
विशेष करून कौलारू घरामध्ये विजेचा वापर करताना शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे घ्यावे. जेणेकरून शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडणार नाहीत.- अरविंद गदगकर अभियंता, हेस्कॉम