सांगली : चिंचली येथील श्री मायाक्का देवीच्या यात्रेला भाविकांनी गर्दी केली होती.  (छाया : गणेश मानस)
बेळगाव

Mayakka Devi Yatra : मायाक्काच्या नावानं चांगभलं..!

चिंचलीची मायाक्का यात्रा उत्साहात; महाराष्ट्र-कर्नाटकच्या लाखो भाविकांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

अंजर अथणीकर

चिंचली (ता. रायबाग) ः कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील श्री मायाक्का देवीची यात्रा गुरुवारी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात झाली. ‌‘मायाक्काच्या नावानं चांगभलंऽऽ‌’, ‌‘म्हाकुआईच्या नावानं चांगभलंऽऽ‌’च्या जयघोषात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेचा गुरुवारी मुख्य दिवस होता. यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकमधील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक उपस्थित होते. विशेषतः सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतून रंगीबेरंगी सजवलेल्या बैलगाड्यांतून भाविक यात्रेला आले होते. लाखो भाविकांच्या सहभागाने पालखी सोहळा उत्साहात पार पडला. यात्रेसाठी कडक पोलिस बंदोबस्त होता. भाविकांसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या होत्या. महाकालीचा अवतार मानल्या जाणाऱ्या मायाक्का देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी बुधवारी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. पहाटेपासून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ‌‘मायाक्काच्या नावानं चांगभलंंऽऽ‌’ असा जयघोष भाविक करीत होते. चिंचलीतील दूध ओढा येथे अंघोळ करून भाविक देवीच्या दर्शनासाठी जात होते. अनेक गावांतून पालख्या आल्या होत्या. वाद्यांच्या गजरात खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करून हनुमान मंदिर ते देवस्थानपर्यंत मिरवणुका काढण्यात येत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT