अंकली : पाण्याच्या टाकीत पडून १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बागलकोट शहरातील नवनगर परिसरात घडली. या घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांनी त्या चिमुकलीला पुन्हा जिवंत करण्यासाठी मृतदेह मिठात ठेवला. या घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे. अमिना पठाण (वय १८ महिने) असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
नवनगरमधील सेक्टर क्र. ३८ येथे ही घटना घडली. अमिना खेळत असताना घरासमोरील एका घरातील पाण्याच्या टाकीत पडली. या घटनेत तिचा गुदमरून मृत्यू झाला. सदर घटना लक्षात येताच तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मुलीला मिठात ठेवल्यास ती पुन्हा जिवंत होईल, अशी समजूत असल्याने कुटुंबीयाने तिचा मृतदेह मिठात ठेवून चमत्काराची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.