बेळगाव

Belgaum Bike Theft Gang : दुचाकी चोरांच्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

तिघांना अटक : ७ दुचाकी जप्त, चिकोडी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

चिकोडी : चिकोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेताना पोलिस पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील ३ मुख्य संशयितांना अटक करून त्यांच्याकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्‍त केल्या आहेत.

याबद्दल अधिक माहिती अशी, ८ ऑगस्ट २०२६ रोजी रेणुका रमेश वडराळे (रा. करोशी, ता. चिकोडी) यांनी चिकोडी पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली होती. १२ जुलै २०२६ च्या रात्री ११ ते १३ जुलै २०२६ च्या पहाटे ५ च्‍यादरम्यान घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

जिल्‍हा पोलिस प्रमुख के. रामराजन आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोपालकृष्ण गौडा व सीपीआय विश्वनाथ चौगले यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. दि. ९ रोजी पोलिसांनी ३ संशयितांना ताब्यात घेतले. अलम ईमामसाब गडद (रा. मिरज दर्गा रोड, ता. मिरज, जि. सांगली), आर. शाहिदअहमद (रा. अशोकनगर, ४ था क्रॉस, शिमोगा), मोहम्मदअकील नजीर गडद (रा. मिरज दर्गा रोड, ता. मिरज, जि. सांगली) अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून ३,७०,००० रूपये किमतीच्या ७ दुचाकी जप्‍त केल्‍या आहेत. यातील ३ दुचाकी चिकोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून, २ अंकली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून, १ सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर १ सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरण्यात आल्या होत्या.

ही कारवाई करणारे सीपीआय विश्वनाथ चौगले, पीएसआय शिवकुमार जरादार तसेच पोलिस कर्मचारी एस. आर. भागोजी, गजानन एस. कांबळे, एस. पी. गलगली, रामू जी. कुळोळी, विजयकुमार बी. पाटील, हणमंतप्पा के. आणि तांत्रिक विभागाचे विनोद तक्कण्‍णवर यांचे जिल्‍हा पोलिस प्रमुखांनी कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT