Chariot procession in the city amidst chants of 'Hare Krishna'
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरेच्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने शनिवारी (दि.२४) बेळगाववासियांना कृष्णमय केले. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन) दुपारी धर्मवीर संभाजी चौकातून रथयात्रेला प्रारंभ झाला.
फुलांनी सजविलेल्या रथामध्ये राधा कृष्ण, नित्यानंद महाप्रभू आणि गौरंग महाप्रभू यांचे आर्चविग्रह ठेवले होते. रथाचे पूजन व आरती केल्यानंतर खासदार इरण्णा कडाडी यांनी श्रीफळ वाढवून रथयात्रेस चालना दिली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्तीरसामृत स्वामी - महाराज, सुंदर चैतन्य महाराज, वृंदावनचे ब्रजेश . चंद्र गोस्वामी प्रभू यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
रथाला समोरच्या बाजूला दोन्ही कडेने दोरखंड बांधण्यात आले होते. डावीकडून पुरुष आणि उजवीकडून महिला रथ ओढत होत्या. वीसहून अधिक सजवलेल्या बैलजोड्यांचा सहभाग होता. सजविलेल्या रथात इस्कॉनचे संस्थापक आचार्य प्रभुपाद यांची प्रतिमा होती. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित विविध देखावे सहभागी झाले होते. यात शरपंजारी पडलेले भीष्म, नरसिंह देव, कालिया मर्दन, झारखंड लिला असे देखावे होते.
ताल धरून नृत्य करणाऱ्या तरुणी, भजन कीर्तनामध्ये सामील झालेले तरुण, रंगीबेरंगी पोशाख करून विविध देखावे सादर करणारे बालक हे रथयात्रेची शोभा वाढवत होते. रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. ठिकठिकाणी नागरिकांकडून पाणी, सरबत, फळे व केळी यांचे वाटप केले जात होते. रथयात्रा मार्गावर प्रसाद पाकिटे वाटप केली जात होती.
रथयात्रा समादेवी मंदिर, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड, टिळक चौकमार्गे शनी मंदिराकडून कपिलेश्वर रेल्वे ब्रिजवरून शहापुरात पोहोचली. तेथून नाथ पै सर्कलमार्गे कृषी भवन, बसवेश्वर सर्कलमार्गे साडेसहा वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामागे उभारण्यात आलेल्या शामियान्यात पोहोचली. यात्रेत संकर्षण प्रभू, माधवचरण प्रभू, नंदनंदन प्रभू, संजीवनी कृपा प्रभू, नागेंद्र प्रभू, प्रेम रस प्रभू, रामप्रभू, राजाराम भांदुर्गे, उंडाळे प्रभू, क्वात्रा प्रभू, आनंद भांदुर्गे, अरविंद कोल्हापूरे आदी कार्यकर्ते कार्यरत होते.
आजचे कार्यक्रम
रविवारी सायंकाळी चार ते पाचपर्यंत नरसिंह यज्ञ होणार असून मानव जातीच्या कल्याणासाठी होणाऱ्या या यज्ञामध्ये अनेक भक्त सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यलीला आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे