Chandgad Accident News  
बेळगाव

Chandgad Accident News | चंदगडमध्ये भीषण अपघात; कार झाडाला धडकल्याने बेळगावचा बांधकाम कांट्राटदार जागीच ठार

Chandgad Accident News | चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा-तिलारीनगर रस्त्यावर झालेल्या भीषण कार अपघातात बेळगाव येथील बांधकाम कांट्राटदार जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

चंदगड (पुढारी वृत्तसेवा):

बेळगाव येथून चंदगड तालुक्यातील पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात होऊन बेळगाव येथील विनायक कलिंग येथील बांधकाम कांट्राटदाराचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य तिघेजन जखमी झाले. ही घटना बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावरील पाटणे फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावरील तिलारीनगर रस्त्यावर घडली. विनायक नेताजी कलिंग (वय ३७, मूळ गाव हलगा व सध्या रा. जयनगर, हिंडलगा, ता. बेळगाव) असे मृत बांधकाम कांट्राटदाराचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद सहप्रवासी पप्पू गंगाराम भोसले (४४, व्यवसाय रिक्षाचालक, रा. ज्योतीनगर, गणेशपूर, बेनकनहळळी) यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. या अपघातास कारणीभूत कारचालक ममयूर बसय्या कांबळे (रा. ज्योतीनगर, गणेशपूर, बेनकनहळळी, ता. बेळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कांट्राटदार विनायक, फिर्यादी पप्पू, चालक ममयूर व जयंत असे चौघेजण आंबेवाडी (ता. चंदगड) येथील निसर्गरम्य जलाशय परिसर फिरायला आले होते. सायंकाळी ते परतत असताना रात्री नऊ वाजता हा अपघात घडला.

तिलारीनगर-पाटणे फाटा या दरम्यान मेघा इंजिनिअरिंग या फॅक्टरीसमोर कारसमोर कुत्र्या आडवा आला. त्याला वाचवण्याकरिता चालकाने कार बाजूला घेतली. यावेळी त्याचा ताबा सुटला आणि रस्त्याकडच्या झाडाच्या बुंध्याला आदळून दुसऱ्या झाडाला जाऊन धडकून सुमारे दीड फूट घासत गेली. यावेळी पप्पू यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली तर विनायक हे बेशुद्ध होऊन पडले होते.

कारचा चालक ममयूर व जयंत हेही किरकोळ जखमी झाले. विनायक यांना उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. चालक ममयूर याने बेदरकारपणे कार चालवल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. गेंजे करत आहेत. विनायक यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT