बेळगाव : कोल्हापूर जिल्हा वनक्षेत्रातील आजरा येथील चाळोबा जंगलातून चाळोबा गणेश हत्तीने बेळगाव तालुक्यात पुन्हा एकदा वर्षभरानंतर प्रवेश केला. सदर हत्तीचे रविवारी (दि. 20) सकाळी आठ वाजता अतिवाड फाटा येथे शेतकऱ्यांना दर्शन झाले. यानंतर परिसरातील शिवारात भीतीचे वातावरण आहे. वन खात्याने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सदर चाळोबा गणेश हत्तीचा गेले 20 दिवसापासून हूक्केरी, चंदगड व गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवरील शेट्टीहळी, चिंचने, कामेवाडी नरगटे या गावच्या गावाशेजारील जंगलात वावर होता. या सीमेवर ताम्रपर्णी नदी तसेच घटप्रभा नदी आहे. तसेच नदीच्या दोन्ही बाजूच्या शिवारातील ऊस पीक, मका पीकावर रोज ताव मारत होता. जवळच नदीचे मुबलक पाणी आहे. यामुळे वीस दिवसापासून या भागात धुमाकूळ घालणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीने अचानकपणे रविवारी पहाटे दड्डी भागातून चंदगड तालुक्यातील किटवाड या धरणाकडे आला. यानंतर तो बेळगाव तालुक्यातील अतिवाड या गावातील जलाशयाकडे आला. यानंतर पहाटे तो पुन्हा महिपाळगडाच्या दिशेने जात असताना रविवारी सकाळी आठ वाजता शेतकऱ्यांना त्याचे दर्शन झाले.
सदर हत्ती वर्षभरापूर्वी सीमाभागात ७० दिवस ठाण मांडून होता. त्यावेळी आक्रमक होत शिवारातील विविध ठिकाणच्या झोपड्या उध्वस्त केल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या रोटर चे नुकसान केले होते. तीन ट्रॉल्या पलटी मारून नुकसान केले होते. तसेच एक बैलगाडी ही मोडून नुकसान केली होती. मोठ्या प्रमाणात ऊस व मका पिकाचे नुकसान केले होते. सध्याही असेच नुकसान करणार, या भीतीपोटी शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र कर्नाटक वनखात्याने संयुक्तरित्या ठोस मोहीम राबवून सदर हत्तीला त्याच्या मूळ जंगलात परतून लावावे अशी मागणी होत आहे.