बेळगाव : यंदाचा काजू हंगाम समाप्तीकडे आला आहे. येत्या दहा दिवसांत काजू उत्पादन जवळपास ठप्प होणार आहे. मात्र, यंदा काजूला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट झाली आहे. मात्र, काजूला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काजूचा हंगाम संपणार आहे. हा हंगाम केवळ दोन महिनेच चालला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच हंगामाची सांगता होणार आहे. दुसर्या टप्प्यातील काजू लागवड यंदा झालेली नाही. यामुळे उत्पादनात सुमारे 30 टक्के घट झाली आहे. त्या तुलनेत दर चांगला मिळत असल्याने शेतकर्यांचे फारसे नुकसान झालेले नाही.
तालुक्याच्या पश्चिम भागात काजूचे उत्पादन अधिक प्रमाणात घेण्यात येते. काजूच्या क्षेत्रात प्रत्येकवर्षी वाढ होत चालली आहे. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून काजू ओळखले जाते. पण, कोणत्या ना कोणत्या कारणातून समाधानकारक उत्पन्न मिळत नाही.
गेली काही वर्षे उत्पादन चांगले होऊनही दराचा फटका बसला होता. यंदा दर चांगला मिळत असला तरी उत्पादन कमी झाले आहे. बदलत्या हवामानाचा फटका काजूला बसल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यातच मध्यंतरी झालेल्या वळीव पावसाने काजू हंगाम लवकर संपण्याच्या मार्गावर आहे.
काजू उत्पादनात घट झाली असली तरी मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे, काजूला चांगला दर मिळाला आहे. गेल्यावर्षी काजूला प्रति किलो 110 रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यंदा प्रति किलो 160 रुपयांपर्यंत दर आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रति किलो 50 रुपये अधिक दर मिळत आहे. आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.