Cashew farmers compensation Pudhari
बेळगाव

Cashew farmers compensation: महाराष्ट्रात भरपाईची घोषणा; कर्नाटकात कधी?

काजू उत्पादकांना प्रतीक्षा : मोहोर जळाल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : यंदा कोकणात काजू, आंबा पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मोहोर जळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने हेक्टरी 22 हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव, खानापूर तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक स्रोत म्हणून काजू आणि आंबा पीक ओळखले जाते. यंदा आंबा आणि काजूचा मोहोर जळाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. केवळ 25 टक्के उत्पन्न मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रकारचे वातावरण बेळगाव, खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. त्यामुळे, काजू उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर पूर्णपणे जळून गेला आहे. हंगाम निम्मा झाला तरी काजू लागवडीला जोर नसल्याने शेतकरी हतबल बनले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेण्यात येते. काजूचे क्षेत्रही अधिक प्रमाणात आहे. कमी गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळणारे पीक म्हणून ओळखले जाते. परिणामी दिवसेंदिवस काजू लागवड क्षेत्रात वाढ होत चालली आहे. यावर्षी काजू, आंबा झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आला. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आशा दुणावल्या होत्या. अधिक उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र, हवामानाच्या बदलामुळे मोहोर जळून गेला. शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

काजू लागवडीचा हंगाम म्हणून मार्च आणि एप्रिल महिना ओळखला जातो. सध्या मार्च महिना संपत आला आहे. एप्रिल महिना त्यानंतर सुरु होणार आहे. परंतु, अपेक्षित काजू लागवड नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारकडे याबाबत मागणी केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT