बेळगाव : मोदगा येथील हॉस्पीटलमध्ये एका तीन वर्षाच्या बालिकेला सोडून पालक गेले होते. तीन महिने उलटले तरी बालिकेचे पालक अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे, मारीहाळ पोलिसांनी याबाबत संबंधीत पालकांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
मोदगा येथील निर्मलनगरमध्ये असलेल्या कार्डिनल ग्रेसियस हॉस्पीटलमध्ये 15 मे रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास तीन वर्षाच्या बालिकेला सोडून गेले होते. तिचे पालक आले नसल्याने हॉस्पीटल व्यवस्थापनाने ही बालिका बालकल्याण खात्याकडे सुपूर्द केली. यानंतर बालकल्याण खात्याने स्वामी विवेकानंद दत्तक केंद्रात या बालिकेची रवानगी केली. याला तीन महिने उलटले तरी पालक बालिकेला नेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी मारीहाळ पोलिसांनी संबंधित अज्ञात पालकांवर निष्काळजीपणा व दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करुन घेतला.
सदर बालिकेची उंची 3 फूट, गोल चेहरा, लांब नाक, अंगाने सडपातळ, गव्हाळ रंग व डोकीवर काळे केस आहेत. तिला बोलता येत नाही. तिच्या अंगावर गुलाबी व निळ्या रंगाचा शर्ट आहे. या बालिकेबाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी मारीहाळ पोलिसांशी संपर्क (0831-2405239 अथवा 9480804111) साधावा, असे आवाहन केले आहे.