बेळगाव : बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत बेळगाव शहरासाठी 100 वाहने मंजूर करण्यात आली आहेत. परिवहनमध्ये दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. लवकरच बसचा तुटवडा, नोकऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार आहे, असे उद्गार परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी काढले.
वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या 28 वा स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन मध्यवर्ती बस स्थानक युनिट 1 ते लोकार्पण, नवीन बसेसचे लोकार्पण, नूतन कामाचा पायाभरणी समारंभ, नवीन भरती प्रमाणपत्रांचे वितरण, अपघात विमा, विनाअपघात सेवा दिलेल्या उत्कृष्ट चालकांचा सत्कार, नवीन सॉफ्टवेअरचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम शनिवारी (दि.28) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार फिरोज सेठ होते. व्यासपीठावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, आमदार राजू कागे, विनय नवलगट्टी, पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, प्रियांग एम., आदी उपस्थित होते.
मंत्री रेड्डी म्हणाले, कित्तूर राणी चन्नम्मांचे नाव परिवहन महामंडळाला नाव देण्यासाठी त्वरित कार्यवाही करु. सरकारने अनेक लोककल्याणकारी प्रकल्प सुरू केले आहेत. दोन हजार नवीन बसेस खरेदी करण्याचे प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागात शक्य तितक्या नवीन बसेस उपलब्ध करून लोकांना सुविधा दिल्या जाणार आहेत.
जारकिहोळी म्हणाले, मंत्री रेड्डी यांच्या कार्यकाळात परिवहन मंडळाचा विकास झाला आहे. 7,800 नवीन बसेस खरेदी केल्या आहेत. ग्रामीण भागात बसची समस्या दूर केली जाईल. त्यासाठी पाठपुरवठा केला जात आहे. आमदार महांतेश केौजलगी, आमदार राजू सेट आदींनी आपले विचार मांडले. मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, राज्यातील काँग्रेस सरकारने राबविलेल्या शक्ती आणि गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणात परीवहन मंडळाचे योगदान मोठे आहे. ग्रामीण लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणातही बसेसचे योगदान महत्वपूर्ण आहे.