बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 8 लाख 75 हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सोमवारी (दि.4) सकाळी कलमेश्वरनगर येथे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बुधवारी (दि.6) शिवाप्पा छत्रप्पा पुजारी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेऊन 24 तासांत चोरीचा छडा लावला असून मुद्देमालासह एकाला अटक केली आहे.
फिर्यादी शिवाप्पा हे पत्नीसोबत कलमेश्वरनगर येथे राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांची मुलगी आणि जावईदेखील राहायला आहेत. 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वा. पुजारी दाम्पत्य आपल्या घराला कुलूप लावून जलगेरी तांडा (ता. बदामी, जि. बागलकोट) येथे गावी गेले होते. त्यांनी जावई आणि मुलगीला घराची देखरेख करावी, असे सांगितले होते. मात्र, रविवारी (दि.3) रात्री 10 ते सोमवारी (दि.4) सकाळी 7 या काळात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून कपाटातील 8 लाख 35 हजार रुपये किमतीचे 167 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 40 हजार 200 रुपये
किमतीचे 1005 ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण 8 लाख 75 हजार 200 रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारुन पलायन केले. पुजारी दांपत्य काल बागलकोटवरून बेळगावला परतल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार एपीएमसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचरण करण्यात आले. याप्रकरणी शिवप्पा पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
कलमेश्वरनगर येथील शिवाप्पा पुजारी यांच्या घरात झालेल्या चोरीचा एपीएमसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला आहे. याप्रकरणी मस्तान अली रसूल शेख (वय 21, रा. चौथा क्रॉस सत्यसाई कॉलनी, वैभवनगर) याला अटक केली असून त्याच्याकडून 6 लाख 64 हजार 403 रुपये किमतीचे 83.100 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 567.180 ग्रॅमचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरीची घटना उघडकीस
आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. त्यावेळी संशयित चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. एपीएमसी पोलिस ठाण्याच्या एमओबी रेकॉर्डमध्ये असलेल्या मुस्ताक अली रसूल शेख याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. मार्केटचे सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष सत्यनाईक, पोलिस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, त्रिवेणी नाटेकर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.