कुडची : रायबाग तालुक्यातील चिंचली यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या 5 चोरट्यांना कुडची पोलिसांनी अटक केली. त्यापैकी दोघा चोरट्यांना उपनिरीक्षक प्रीतम नाईक यांनी रंगेहाथपकडले होते.
3 फेब्रुवारी रोजी दुपार सत्रात प्रमोद शांतीनाथ शेट्टी (वय 55, रा. चिंचली, ता. रायबाग) यांनी कुडची पोलिस ठाण्यात काही चोरट्यांनी मारहाण करून खिशातील रक्कम व मोबाईल हिसकावून घेतल्याची तक्रार दिली होती. तसेच त्यांचे मित्र रमेशच्या घराच्या दारावर दगडफेक करून एकाला मारहाणही केली होती. एका घरातील लक्कव्वा हलेमणी यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची बोरमाळ आणि 600 रुपये हिसकावून घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. शिवाय घराबाहेर असलेली चार्जिंग बॅटरीही लंपास केल्याची तक्रार कुडची पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.
कुडची पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्यांचा शोध घेतला असून त्यापैकी 4 फेब्रुवारी रोजी चिम्या उर्फ आरुश काळे (वय 26, रा. बोलवाड, ता. मिरज), 13 रोजी 3 आरोपी सापडले असून पोटत्या लसनप्पा पवार (वय 50, रा. आरग), प्रवीण शंकर पवार (वय 27, रा. नरवाड रोड आरग, ता. मिरज), वटेरे जिगल्या काळे (वय 25, रा. आंबेडकरनगर बोलवाड, ता. मिरज) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकाचे नाव समजू शकले नाही.
चोरट्यांकडून 20 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन, 50 हजार रुपये किमतीचा 5 ग्रॅम सोन्याचा हार आणि 300 रुपये, एक चाकू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीपीआय रतनकुमार जिरग्याळ, उपनिरीक्षक प्रीतम नायक, आरिफ मुदन्नार, हवालदार एस. एस. सावनूर, अशोक शांडगे, बी. एल. वासट्टी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.