BPL card holders: पेन्शनच्या प्रतीक्षेत बीपीएल कार्डधारक Pudhari
बेळगाव

BPL card holders: पेन्शनच्या प्रतीक्षेत बीपीएल कार्डधारक

योजना अनियमिततेच्या विळख्यात : तीन-चार महिने रक्कम मिळत नसल्याने नाराजी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्य सरकारकडून बीपीएल रेशनकार्डधारकांसाठी सुरू करण्यात आलेली मासिक 1,200 रुपयांची पेन्शन योजना सध्या अनियमिततेच्या विळख्यात सापडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर जमा होत नसल्याने लाभार्थींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अनेक गरजू कुटुंबांसाठी ही 1,200 रुपयांची मदत उदरनिर्वाहाचा मुख्य आधार ठरली आहे. मात्र, अलीकडच्या काळात ही पेन्शन नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कधी कधी तीन ते चार महिने उलटूनही खात्यावर पैसे जमा होत नाहीत. यामुळे औषधोपचार आणि दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या, असा प्रश्न लाभार्थींंसमोर उभा ठाकला आहे. पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश आहे. सरकारकडून मिळणारी ही तुटपुंजी मदतही वेळेवर न मिळाल्यास या कुटुंबांचे संपूर्ण बजेट कोलमडते. सण-उत्सव असो वा वैद्यकीय आणीबाणी, वेळेवर पैसे न मिळणे ही या लाभार्थींची मोठी अडचण ठरत आहे.

महागाईच्या काळात मिळणारी 1,200 रुपयांची रक्कम मुळातच तोकडी आहे. त्यातही ती वेळेवर मिळत नसल्याने बेळगावमधील मोलमजुरी करणाऱ्यांना उसनवारी करण्याची वेळ आली आहे. या गंभीर विषयावर स्थानिक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक कारणांकडे बोट दाखवले आहे. निधी मंजूर असला तरी तांत्रिक पडताळणीमुळे काही खात्यांवर पैसे जमा होण्यास उशीर होत आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी संथगतीने सुरु असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

पेन्शनची रक्कम दरमहा एका ठराविक तारखेला जमा व्हावी. थकीत असलेली मागील महिन्यांची रक्कम त्वरित वितरित करावी. प्रशासकीय दिरंगाई दूर करुन ही प्रक्रिया सुटसुटीत करण्याची मागणी होत आहे. एकीकडे हमी योजनांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना समाजातील शेवटच्या घटकाला त्यांच्या हक्काच्या 1,200 रुपयांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन पेन्शन नियमित करावी, अशी मागणी होत आहे.

पेन्शन नियमित मिळत नसल्याने अनेक कुटुंबाचे खर्चाचे गणित बिघडत आहे. दर महिन्याला लाभार्थी वर्गाला या पेन्शनची प्रतीक्षा असते. पण, तीन तीन महिने खात्यावर रक्कम जमा होत नाही. शासनाने ही पेन्शन नियमित द्यावी.
- नितीन काकडे, रहिवासी, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT