बेळगाव

Rohit Patil | सीमाभागावरील प्रेम कायम राहील : आमदार रोहित पाटील

नागुर्डावाडा येथे नागेश महारुद्र मंदिराचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

खानापूर ‍: बेळगाव-खानापूर सीमाभागाने माझ्या वडिलांवर अपार प्रेम केले. सीमा चळवळ आणि लोकांवरील प्रेम यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही कवठेमहाकाळ-तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी दिली. नागुर्डावाडा (ता. खानापूर) येथील श्री नागेश महारुद्र मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंदिर कमिटीचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई होते.

आमदार पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराचे, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते गाभाऱ्याचे फीत कापून उद्‌घाटन करण्यात आले. माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी, माजी महापौर मालोजी अष्टेकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

आमदार हलगेकर यांनी ग्रामदेवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा गावच्या सांस्कृतिक ऐक्याचे आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. मंदिर उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी अवघ्या आठ दिवसात नागुर्डावाडा रस्त्याला मंजुरी देऊन काँक्रिटीकरणाचे काम देखील पूर्ण केले. यामुळे भाविकांची गैरसोय दूर झाली असल्याचे नमूद केले.

सरदेसाई म्हणाले, नागेश महारुद्र मंदिराची संकल्पना अनोखी आहे. मंदिर परिसरात विपुल ग्रंथसंपदेने परिपूर्ण असलेले वाचनालय साकारण्यात आले आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घालण्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम होणार आहे. डोळस श्रद्धा निर्माण करण्यासाठी यापुढेही कार्यरत राहू.

माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, प्रमुख वक्ते वासुदेव चौगुले, ईश्वर घाडी, आबासाहेब दळवी यांची भाषणे झाली. सोहळ्यास गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, प्रमोद कोचेरी, अमृत शेलार, पंडित ओगले, धनश्री सरदेसाई, लक्ष्मी पाटील, अमित देसाई, आर. एम. चौगुले, अंकुश केसरकर यांच्यासह नागुर्डा, नागुर्डावाडा, विश्रांतवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते. स्वागत ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. राघोबा चापगावकर यांनी आभार मानले. अजित सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT