बेळगाव : आयुक्त कार्तिक एम. यांच्या कक्षात तपासणी करताना सीपीआय जे. एम. कालिमिर्ची, उपायुक्त उदयकुमार तळवार. 
बेळगाव

Bomb Threat Email | महापालिका उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी

पोलिसांची धावपळ : बॉम्ब निष्क्रिय पथक, श्वान व फॉरेन्‍सिक पथकाकडून तपासणी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महापालिका कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी अनोळखी ईमेल द्वारे आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. बॉम्ब निष्क्रिय पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून दोन तास तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयास्पद काहीही आढळून आणले नाही त्यामुळे बॉम्ब ठेवल्याची अफवाच निघाली. दरम्यान या साऱ्या प्रकारात कर्मचारी आणि लोकांची चांगलीच धावपळ उडाली.

रविवारची साप्ताहिक सुट्टी झाल्यानंतर आज सोमवारी (दि. ९) महापालिकेत सर्व अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. पण, महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर अनोळखी व्यक्तीचा ई-मेल आला. बाँम्ब ब्लास्ट असा मजकूर त्यामध्ये होता. त्यामुळे आयुक्त कार्तिक एम. यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मार्केट पोलीस ठाण्याला माहिती दिली. मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय जे. एम. कालिमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक, बॉम्ब निष्क्रीय पथक, श्वान पथक दाखल झाले. दरम्यान महापालिकेतील सर्व कर्मचारी आणि विविध कामांसाठी आलेल्या लोकांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले. मुख्य गेट बंद करण्यात आले. काही प्रमाणात धावपळ उडाली. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस पथकाने महापालिका आयुक्त कक्षासह सभागृह, विविध खात्यांचे विभाग, महापौर, उपमहापौर कक्ष, आमदारांचे कक्ष यासह सर्व भाग तपासला. दोन तास कसून तपास करण्यात आला. यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे अधिकारी आणि पोलिसांना सुटकेचा निश्वास सोडला. या साऱ्या गदारोळात दिवसभर कामकाज मात्र बंद ठेवण्यात आले होते.

ई-मेल कुणी केला?

महापालिका बॉम्बने उडवून देणारा धमकीचा ई-मेल कुणी केला, याबाबत महापालिका आणि पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या ई-मेलची माहिती घेण्यात येत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सुरवातीला महापालिका कार्यालयात फोन करून बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती पसरली होती. पण, त्यानंतर अधिकाऱ्यांनी ई-मेलव्दारे धमकी देण्यात आली असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर अनोळखी व्यक्तीचा ई-मेल आला होता. त्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आपण खबरदारी म्हणून ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांकडून कसून तपासणी केली आहे. त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
कार्तिक एम., महापालिका आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT