Satish Jarkiholi Pudhari
बेळगाव

Satish Jarkiholi | भाजपकडून मुस्लिम,पाकिस्तानचा फक्त वापर : मंत्री सतीश जारकीहोळी

नीट पेपरफुटीला केंद्र जबाबदार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : केंद्र सरकारकडे मुस्लिम समाज, शेतकरी व कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासारख्या आहेत. मात्र भाजपला मुस्लिम व पाकिस्तान हे शब्द कसे वापरायचे एवढेच माहिती आहे. हे शब्द ऐकून जनता आकर्षित होईल. असा त्यांचा भ्रम असून हा त्यांचा नेहमीचा राजकीय स्टंट राहिला आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना जारकीहोळी यांनी नीट पेपरफुटीमागे केंद्र सरकारची बेजबाबदारी स्पष्ट असल्याचाही आरोप केला. केंद्रीय शिक्षणमंत्री या विषयावर किंचितही चिंता व्यक्त करत नाहीत. प्रसारमाध्यमांसमोर येऊन उत्तर देण्याचे धाडसदेखील त्यांच्यात नाही, असे ते म्हणाले.

शाळांमध्ये चालवल्या जात असलेल्या भगव्या अभियानाबद्दल बोलताना जारकीहोळी म्हणाले, आमच्या लहानपणापासून अशा भगव्या मोहिमा भाजप राबवत आहे. यात काही नवीन नाही. देशात डावे व उजवे असे वेगवेगळे विचारप्रवाह आहेत. ज्याला जो विचारप्रवाह हवा तो निवडतो. त्यामुळे आम्हाला आमच्या विचारप्रवाहाबद्दल बोलायला आवडेल.

नेतृत्त्वबदलाबद्दल माहीत नाही

राज्यात सुरू असलेल्या नेतृत्व बदलावर दिल्ली पातळीवर काय चर्चा सुरू आहे, हे अजून माहीत नाही. किती मंत्री बदलले जातील किंवा मंत्रिमंडळ विस्तार कधी केला जाईल, याचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागणार असल्याचेही जारकीहोळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT