बेळगाव ः सर्वेक्षण प्रक्रियेच्या प्रारंभावरून भाजप नगरसेवकाने अधिकारी आणि आमदार राजू सेट यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केल्यामुळे पहिल्याच दिवशी राजकीय गोंधळ दिसून आला. नगरसेवक संदीप जिरग्याळ आणि आमदार सेट यांच्यात वादावादी झाली.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये अंतर्गत आरक्षणासाठी सोमवारी (दि. 5) सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सदाशिवनगर परिसरातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापालिका आयुक्त शुभा बी. आणि आमदार राजू सेट उपस्थित होते.
सर्वेक्षणाची सुरुवात माजी महापौर सविता कांबळे यांच्या घरापासून होणार होती. मात्र, नियोजित ठिकाणी मोबाईल अॅप डाऊनलोड होण्यात तांत्रिक अडथळा आल्याने ही प्रक्रिया एका सामान्य नागरिकाच्या घरातून सुरू करण्यात आली.
दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या भाजप नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी या बदललेल्या योजनेवर आक्षेप घेत महापालिकेचे उपायुक्त उदयकुमार तरवाळ यांच्यावर आवाज चढवला. आमदारांचे ऐकून इथे राजकारण करता का, असा प्रश्न त्यांनी अधिकार्यांना विचारला. त्यामुळे काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला.
यावेळी तत्काळ हस्तक्षेप करत आमदार सेट यांनी नगरसेवक जिरग्याळ यांना जाहीरपणे समज दिली. अधिकार्यांशी अशा पद्धतीने चढ्या आवाजात बोलू नये. प्रशासन आपल्या कामात व्यस्त असून, तांत्रिक अडचणी सर्वत्र येत असतात, याची जाणीव त्यांनी करून दिली.
नगरसेवक जिरग्याळ यांनी अधिकार्यांनी शिष्टाचाराचा भंग केला असल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाचीही मागणी केली. संपूर्ण प्रकरणात अधिकार्यांनी संयम राखत परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर काही काळासाठी प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.