बेळगाव

Belgaum News : बेळगाव उत्तरमध्ये आठ हजार बोगस मतदार

भाजपचा आरोप; सखोल चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात ८ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मतदार यादीतील संशयास्पद नोंदींची सखोल चौकशी करून बोगस मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १५ ) जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना बेळगाव उत्तर मतदारसंघातील अनेक प्रभागांमध्ये स्थलांतरित नागरिकांची तसेच कथित बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मतदार यादीतील आक्षेपार्ह नोंदी वगळण्यासाठी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला असता बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून अर्ज स्वीकारत नाहीत. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटींविरोधात हरकत नोंदविण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

मतदान केंद्र क्रमांक १९६, १९७ , २१२, २१३, २१४ , २१५ आदी ठिकाणी बोगस नावे दाखल केली आहेत. यासंदर्भातही हरकत नोंदविण्यासाठी गेल्यानंतर अर्ज स्वीकारले गेले नाहीत. एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार यादीतील संशयास्पद नोंदींची नि:ष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी, बोगस मतदारांची नावे वगळावीत आणि हरकतीचे अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्‍यात आली आहे.

यावेळी ॲड. एम. बी. जिरली, डॉ. रवी पाटील, मुरगेंदगौडा पाटील, गीता सुतार, उज्‍ज्वला बडवाण्णाचे, राजशेखर डोणी, राजेंद्र हरकुणी, नागराज पाटील, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT