Crime News
निपाणी : पत्नीशी फोनवरून जोरात भांडण झाल्याने राग अनावर होऊन बिहार येथील पतीने लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सावंत कॉलनी येथे उघडकीस आली. शिवकुमार उपेंद्र पंडीत (वय २५ रा. बिहार) असे मयत झालेल्या प्लंबिंग कामगार पतीचे नाव आहे. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत शिवकुमार पंडित हा आपल्या अन्य तिघा मित्रांसमवेत प्लंबिंग कामासाठी निपाणी येथे आला होता.गेल्या दोन महिन्यापूर्वी हे चौघेजण शहराबाहेरील सावंत कॉलनी येथे कडगावे बंधू यांच्या घरात भाडोत्री म्हणून राहत होते.या चौघांचे प्लंबिंगचे काम शहरातील एका कॉलेजमध्ये सुरू होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी चौघेजण नेहमीप्रमाणे प्लंबिंग कामासाठी गेले होते. दुपारी तिघा मित्रांना सांगून शिवकुमार पंडित हा घरी परतला. त्यानंतर त्याने घरी आल्यानंतर लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याच्या अन्य तिघे मित्र कामावरून घरी आल्यानंतर नेमका प्रकार उघडकीस आला. त्यानुसार याची माहिती पोलिसांसह मयत शिवकुमार याचा बेळगाव येथे राहत असलेला भाऊ सुजितकुमार पंडित याला देण्यात आली.
घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रशांत कुदरी यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा शिवकुमार याचा भाऊ सुजितकुमार पंडीत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मयत शिवकुमार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मयत शिवकुमार याचे कामावरच दिवसभर फोनवर पत्नीशी भांडण झाले होते. या रागातूनच तो दुपारी घरी आला होता. याच कारणातून त्याने जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक रमेश पवार करत आहेत.