कारवार : मुंबईहून खासगी आराम बसमधून भटकळला आलेल्या एका आलेल्या पार्सलमध्ये 49 लाख रुपये रोख रक्कम व 400 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामधील एकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु असून अन्य एकजण फरारी झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, खासगी आराम बस मुंबईहून मंगळूरकडे जात होती. त्यात भटकळमधील एका व्यक्तीच्या नावे मुंबईहून पाठवलेले पार्सल होते. बस भटकळमध्ये आली असता बाबण्णा नावाच्या व्यक्तीने पार्सल स्वीकारले. पार्सल उचलून रिक्षातून नेले जात होते. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिवाकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उस्माननगरजवळ रिक्षा थांबवून तपासणी केली असता त्यात सुमारे 49 लाख रुपयांची रोख रक्कम व 400 ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले.
बाबण्णाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी उस्माननगरच्या मोहम्मद इरफान आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा नोंदविला आहे. तो पळून गेला आहे. पोलिसांनी उत्पन्न कर कायद्यानुसार प्रकरण नोंदविले असून तपास सुरु आहे.