Fraud Pudhari
बेळगाव

Karnataka Fraud Case: भेटवस्तूंच्या आमिषाने १.७७ कोटी गमावले

बंगळूरच्या महिलेची फसवणूक : सोशल मीडियावर ओळख झालेल्या भामट्याकडून गंडा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : सोशल मीडियावर भेटलेल्या एका भामट्यावर विश्वास ठेवून रेशमी साड्या आणि महागड्या भेटवस्तूंच्या आमिषाने एका महिलेने तब्बल १.७५ कोटी रुपये गमावले. बंगळूरमधील यशवंतपूरमध्ये हा प्रकार घडला असून, फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे.

येथील एका महिलेची फेसबुकच्या माध्यमातून साहिल जुग्गल या भामट्याशी ओळख झाली. दोघांनी काही काळ मेसेंजरवर गप्पा मारल्या आणि त्यानंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. त्यानंतर त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले. साहिलने आपण रशियामध्ये काम करत असल्याचे सांगितले होते.

परदेशातून भेट म्हणून महागड्या साड्या, रत्ने आणि हिऱ्यांचे दागिने पाठवत त्याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनंतर, साहिलने त्या महिलेला फोन केला. माझ्याकडे भारतीय चलन नाही. कृपया मला सीमाशुल्क भरण्यासाठी तात्पुरते ४० लाख रुपये द्या. मी भारतात परतल्यानंतर पैसे परत करेन, असे त्याने सांगितले.

त्या महिलेने पैसे कुणाला देऊ अशी विचारणा केल्यानंतर त्याने अर्ध्या फाडलेल्या १० रुपयांच्या नोटेचा फोटो पाठवला. जी व्यक्ती तिला ती नोट दाखवेल, तिला पैसे देण्यास सांगितले. साहिलने सांगितल्याप्रमाणे ती महिला हॉटेलमध्ये गेली आणि तिला फाडलेली नोट दाखवणाऱ्या व्यक्तीला तिने ४० लाख रुपये दिले. यानंतर, कस्टम अधिकारी म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने फोन करून वारंवार पैशांची मागणी केली.

भेटवस्तू रूपाने मिळालेल्या हिऱ्यांचे मूल्य जास्त असल्याने विविध शुल्क भरावे लागतील, असे सांगितले. महिलेकडून टप्प्याटप्प्याने एकूण १.७५ कोटी रुपये घेण्यात आले. बराच काळ झाल्यानंतरही भेटवस्तू न मिळाल्याने त्या महिलेला संशय आला. तिने चौकशी केले असता फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिने उत्तर विभाग सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT