बंगळूर : आयपीएल चषक जिंकल्यानंतर आरसीबी क्रिकेट संघाच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल बंगळूर शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह डीसीपी, पीआय यांना निलंबित करण्यात आले आहे; तर आरसीबी संघ व्यवस्थापन, विजयोत्सव आयोजित करणार्या डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डीकुन्हा यांचा एकसदस्यीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेंगराचेंगरीनंतर तातडीने पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्यांनी गुरुवारी रात्री तातडीची पत्रकार परिषद घेत वरील घोषणा केल्या. यासोबतच कब्बन पार्क पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायमूर्ती मायकल डीकुन्हा आयोगाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे सीआयडीलाही एका महिन्याच्या आत तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विजयोत्सव सोहळ्याचे आयोजक, आरसीबी संघ प्रशासक आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या प्रमुखांचे अपयश स्पष्ट होते, म्हणूनच या तिन्ही संघटनांच्या प्रमुखांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बंगळूर शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त पोलिस आयुक्त विकास कुमार, मध्य विभागाचे डीसीपी शेखर, कब्बन पार्क पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त बालकृष्ण, निरीक्षक गिरीश आणि चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेचे प्रभारी पोलिस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
चेंगराचेंगरीमुळे कार्यक्रम आयोजक आणि पोलिस यंत्रणेचे अपयश हे कारण समोर येत आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कर्नाटकात यापूर्वी अशा चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे त्यांच्या लक्षात नाही. उपमुख्यमंत्री असताना आणि आमदार झाल्यानंतर, मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना अशा प्रकारची चेंगराचेंगरीची घटना घडली नव्हती. ही एक अतिशय भयानक दुर्घटना आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनाच धक्का बसला असला, असे मुख्यमंत्री म्हणाले.