बंगळूर : कॉलेजचे सहा विद्यार्थी आणि एका कामगारासाठी शुक्रवारची पहाट काळ बनून आली. कारमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटल्याने कारने आधी दुचाकीला उडवले आणि पुढे महाकाय कँटरला धडक दिली. या तिहेरी अपघातात आधी दुचाकीचालक आणि नंतर कारमधील सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सहाही विद्यार्थी यलेहंकाच्या सीएमआर पीयू कॉलेजचे असून सतरा-अठरा वयोगटातील आहेत.
बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील होसकोटे तालुक्यातील एम. सत्यवर गावाजवळ शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. होसकोटे-दाबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर कार भरधाव होती. त्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. देवनहळ्ळी येथील रहिवासी गगन असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अश्विन, अयान अली, भरत, अरहानशरीफ, इथन जॉर्ज, शरथ अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सगळे मूळचे केरळचे असून ते सर्वजण कोतनूर येथे राहत होते.
पहाटे 4.30 च्या सुमारास होसकोटेहून हे विद्यार्थी एक काराने दबासपेट राष्ट्रीय महामार्गावरून देवनहळ्ळीकडे जात होते. सुलीबेले पोलिस स्थानकाच्या हद्दीत एम. सत्यवर येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला कारने पहिल्यांदा धडक दिली. त्यानंतर कारचे नियंत्रण सुटून कार कँटरला धडकली.
घटनेची माहिती कळताच सुलिबेले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले, पण सातही जणांचा आधीच मृत्यू झाला होता. मृतदेह विच्छेदनासाठी होसकोटे सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. प्राथमिक तपासात कार चालकाने वेगामुळे नियंत्रण गमावले, असे आढळून आले आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारमधील सर्व एअरबॅग्ज निकामी झाल्या होत्या.