बंगळूर : मदरशातून सहलीला गेलेली चार मुले कालव्यात बुडाली. सदर घटना मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटणा तालुक्यातील अरकेरे गावाजवळील रामास्वामी येथे शनिवारी (दि. 1) घडली. यातील एका मुलीला बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. इतर तिघे मुले बेपत्ता आहेत.
आयशा (वय 13) असे मृत मुलीचे नाव आहे. हानी (वय 14), अरफिन (वय 13) आणि तरवीन (वय 13) ही मुले बेपत्ता आहेत. म्हैसूरच्या शांतीनगर येथील एका मदरशातील मुले सहलीला गेली होती. शनिवारी संध्याकाळी 5.30 वा. कालव्याजवळ खेळत असताना ही मुले कालव्यात गेली होती. यावेळी चार मुले वाहून गेली. यातील आयशाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हानी, अरफिन आणि तरवीन ही मुले बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाचे जवान कालपासून त्यांचा शोध घेत आहेत; मात्र रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. अरकेरे पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.