Drug 
बेळगाव

Bengaluru Drug seizure: बंगळुरात ३५ कोटींचे अमली पदार्थ जप्त

आठजणांना अटक : साडेसतरा किलो एमडीएमएसह कार हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : बंगळूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाविरुध्द मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु केली आहे. दरम्यान पोलिसांनी तीन परदेशी, तीन परप्रांतीय व दोन स्थानिक अशा एकूण आठजणांना अटक करुन ३५ कोटी रुपयांचे एमडीएमए जप्त केले आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त सीमंतकुमार सिंह यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली आहे.

रीना यादव (वय ५०, रा. नवी दिल्ली), देबशीष बॅनर्जी (वय ६६), धीरज (वय ३३), डॅना गारलँड (वय ३९, रा. सेनेगल), मार्गेथ चाले (वय ३६, रा. टांझानिया, ओबिनाजू रिटा (३४, रा. नायजेरिया), मोहम्मद मन्सूर (वय ३०, बेलथंगडी, अब्दुल समीद (वय ३८, रा. बंटवाल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३५ कोटी रुपये किमतीचे १७ किलो ५०० ग्रॅम एमडीएमए, चार मोबाईल फोन व दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले, हेब्बाळमधीस आनंदनगरच्या उन्नती लेआउटच्या मुख्य रस्त्यावरील एका अपार्टमेंटसमोर काहीजण वाहनात बसून अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळताच हेब्बाळ पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. चौकशीवेळी त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एका महिलेसह तिघांना अटक करुन त्यांची चौकशी करण्यात आली. दिल्लीतील एका अज्ञात व्यक्तीकडून एमडीएमए हे अमली पदार्थ कमी किमतीत खरेदी करुन ग्राहकांना जास्त किंमतीत विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्याकडून ४ किलो १८० ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली एक कार व चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

अटक केलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोडकन्नहळ्ळीतील एका घरातून १० किलो १२० ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. तर एका परदेशी नागरिकासह दोन महिला व त्यांना एमडीएमएचा पुरवठा करणाऱ्या दिल्लीस्थित एका व्यक्तीला आणि हरियाणा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT