Digital Arrest Cyber Fraud Pudhari
बेळगाव

Bengaluru Digital Arrest Scam: बंगळूर ‘डिजिटल अरेस्ट’चे धागेदोरे बेळगावात?

वृद्ध उद्योजकाची १५ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून कसून चौकशी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बंगळूरमध्ये राहणाऱ्या दुबईतील निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल २४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या तपासात बेळगावमधील आणखी एका मोठ्या फसवणुकीचे धागेदोरे समोर आले आहे. बेळगावातील एका वृद्ध उद्योजकाची १५ कोटी ४५ लाख रुपयांना गंडवण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणात बंगळूरमध्ये अटक केलेल्या सहा संशयितांचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरु आहे.

सायबर गुन्हेगारांनी निवृत्त शिक्षिका लक्ष्मी राममूर्ती (वय ७४) यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल २४ कोटी रुपये उकळल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास करताना बंगळूर सायबर क्राईम पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून बेळगावातील वृद्ध उद्योजकाच्या फसवणूक प्रकरणाचे धागेदोरे समोर येऊ लागली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये पलकभाई पटेल, अमित नरेंद्र पटेल (दोघेही अहमदाबाद), गौरवकुमार (बिहार), अकबर मलिक (महाराष्ट्र), ओमप्रकाश राजपूत (नवी दिल्ली) आणि शिवाननम (तामिळनाडू) यांचा समावेश आहे. या संशयितांच्या बँक खात्यांमधील सुमारे ४ कोटी रुपये गोठवण्यात आले असून १ कोटी ४५ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेळगावातील वृद्ध उद्योजकाला ७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपयांना गंडवण्यात आले होते. या काळात संबंधित व्यक्तीला वारंवार फोन करुन त्यांचे बँक खाते, आधार क्रमांक आणि आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले. अटक होण्याची भीती दाखवत आरोपींनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडल्याचा संशय आहे.

विशेष म्हणजे, बंगळूरमधील शिक्षिका आणि बेळगावातील वृद्ध उद्योजक या दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच प्रकारची कार्यपद्धती वापरण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. तुमचा सहभाग मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आहे, तुमचे खाते तपासांतर्गत आहे, अशा धमकीवजा भाषेत फोन करुन पीडितांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले होते. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनंतर बेळगाव पोलिसांनीही चौकशीला वेग दिला आहे. त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स, बँक व्यवहार, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि आर्थिक देवाणघेवाणीची माहिती तपासली जात आहे. बेळगावातील प्रकरणात आणखी काहीजणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT