बंगळूर : पीएम किसान योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये माझे नाव आहे. परंतु, माझ्या बँक खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. पीक विमा करताना सर्व्हर आणि नेटवर्क समस्या भेडसावतेय...
अशा प्रकारची चौकशी करणारे रोज शेकडो फोन रयत कॉल सेंटरवर येत असतात. राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी फोन करुन प्रश्नांचा भडिमार करत आहेत. त्यामुळे, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना रयत विचारणा केंद्र म्हणजे वरदान ठरले आहे.
शेतकऱ्यांना माहिती, सल्ला, मार्गदर्शन आदी समस्यांबाबत रोज फोन येत असतात. कृषी खात्याने 2023 ऑगस्टपासून हे केंद्र सुरु केले आहे. कृषी खात्याने विना शुल्क 18004253553 हा क्रमांक सुरु केला आहे. या फोनवर विचारणा करणारे बहुतेक शेतकरी पीएम किसान, पीक विमा, पीकपाणी नोंदणी याबाबत माहिती विचारतात. 2023 ऑगस्टपासून 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यभरातून आतापर्यंत 2,89,552 फोन आले आहेत. त्यापैकी 2,41,151 फोन पीएम किसान, पीक विमा याबाबत विचारणा करणारे आहेत.
पीएम किसान योजनेतून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देते. चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपयांची मदत करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा होते. त्याचबरोबर पीकविमा, पीक पाहणी याबाबत विचारणा करण्यात येते. कॉल सेंटर सकाळी 8 पासून सायंकाळी 7 पर्यंत सुरू असते. यासाठी कृषी खात्याने 21 जणांची नेमणूक केली आहे. रोज 500 पेक्षा अधिक कॉल येत असतात. त्यांना तज्ज्ञांच्या मदतीतून माहिती देण्यात येते.