बंगळूर : विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 9) जाहीर झाला असून त्यात गतवर्षीपेक्षा 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा राज्यात 86 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या 7 लाख 10 हजार 363 विद्यार्थ्यांपैकी 6.10 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी 73.45 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परीक्षा, अध्यापन व गुणपद्धतीत केलेल्या अनेक बदलांमुळे निकालाची टक्केवारीही वाढल्याचे शालेय शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी म्हटले आहे.
विज्ञान शाखेत उत्तीर्णतेचा दर सर्वाधिक 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वाणिज्य शाखेतील सरासरी उत्तीर्णतेचा 80 टक्के असून कला शाखेचा निकाल 75 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाची बारावी परीक्षा 28 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान 1,217 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी 5,174 महाविद्यालयांमधील 7.10 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विज्ञान शाखेसाठी 2.92 लाख, वाणिज्य शाखेसाठी 2.11 लाख व कला शाखेसाठी 1.42 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
मंगळूर जिल्ह्यातील अल्वा कॉलेजची विद्यार्थिनी दिशाने वाणिज्य विभागात 600 पैकी 600 गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाणिज्य विभागात बेळगावच्या गोगटे कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी कुलकर्णीने 600 पैकी 599 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. विजयनगर जिल्ह्यातील कोट्टूरमधील इंदू पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थिनी संगीता व डी. एम. अर्चना यांनी प्रत्येकी 600 पैकी 598 गुण मिळवून कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून याच कॉलेजचे विद्यार्थी कला शाखेत राज्यात अव्वल ठरत आहेत. विज्ञान विभागात मंगळूरच्या एक्सपर्ट पदवीपूर्व कॉलेजच्या शमन्यू शेट्टीने 598 गुण (99.67%), नंदन नायक 598 गुण (99.67%), दीक्षा शेनॉय 596 गुण (99.33%), अदिती 596 गुण (99.33%), अमोघ लोक 596 गुण (99.33%) व सुहान बिल्लव 598 गुण (99.33%) मिळवले आहेत.
वाणिज्य विभागात 9 विद्यार्थ्यांनी 590 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यात एकाच महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांनी वाणिज्य विभागात यश मिळवले आहे. यावेळीही सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी नोंदवून उडुपी व मंगळूर जिल्हे आघाडीवर आहेत. बंगळूर शहर व म्हैसूर जिल्ह्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच गुणपत्रिका निकालासोबत उपलब्ध असून ती डिजिलॉकरवरून डाऊनलोड करता येणार आहे.