बंगळूर : मालमत्तेच्या वादातून सराईत गुंड बिक्लू शिवाच्या झालेल्या हत्येप्रकरणी माजी मंत्री व भाजप आमदार भैरती बसवराज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यांना सायंकाळी बंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. ते अहमदाबादहून विमानाने बंगळुरात दाखल झाल्यानंतर ही कारवाई केली.
अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्यापासून बेपत्ता असलेल्या बसवराज यांच्या विरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीसही जारी करण्यात आली आहे. ते परदेशात पळून जाऊ शकतात, अशी भीती होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये भारती नगरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी बिक्लू शिवाची हत्या केली होती. मालमत्तेच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हत्येआधी शिवा बसवराज यांना भेटून गेला होता. त्याने बसवराज यांना खंडणीसाठी धमकी दिल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून नियमित जामीनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे.