बंगळूर/बेळगाव : बेळगावात २,५०० मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी भाजपचे आमदार अभय पाटील यांनी पत्र लिहिले असल्याचा आरोप केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी लिहिलेले पत्र दाखवून त्यांनी हे सर्व मतदार अल्पसंख्याक असून अशा प्रकारे मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले, आम्ही सातत्याने मतांची चोरी होत असल्याचे सांगत आहोत. त्याला पूरक असे हे आमदारांचे पत्र आहे. या पत्राला निवडणूक आयोगाने उत्तर देऊन अशा प्रकारे मतदारांची नावे हटविता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. एका घरातील ५० जणांची नावे हटविण्यासाठी अर्ज करण्यात आला असून या अर्जांमध्ये कुणी बनावट अर्ज भरुन सादर केला असल्यास तो शिक्षेस पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. फॉर्म ७ सादर करुन मतदार यादीतून नावे हटविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी माझी मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार पाटील यांचे पत्र आमच्याकडे असून इतरांची मते हटविण्यासाठी पत्र देण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? कायद्याचे उल्लंघन करुन आमदारांनीच मोठ्या प्रमाणात नावे हटविण्यासाठी पत्र दिले आहे. कायद्याच्या विरोधात नावे हटविण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही हरिप्रसाद यांनी स्पष्ट केले.