बेळगाव : नैऋत्य रेल्वेकडून बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांची घोषणा केली आहे. ही एक्सप्रेस गुरुवारपासून (दि. २०) धावणार असून त्यासाठी बुकिंगही सुरु झाले आहे. श्रावणानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांची सोय या रेल्वेमुळे होणार आहे.
बंगळूर-बेळगाव एक्सप्रेस २० व २२ रोजी रेल्वे धावणार असून बेळगाव-बंगळूर मार्गावर २१ व २३ रोजी धावणार आहे. बंगळूरच्या एसएमव्हीटी रेल्वे स्थानकातून सायंकाळी ७ वाजता ही एक्सप्रेस निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ मिनिटांनी बेळगावला पोचणार आहे. परतीच्या प्रवासात सायंकाळी ५.३० वाजता बेळगावमधून निघालेली एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता बंगळूरला पोचणार आहे.
खानापूर, लोंढा, धारवाड, हुबळी यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. या रेल्वेला एकूण १९ बोगी जोडले जाणार आहेत. अधिकाधिक प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे.