बेळगाव

Belgaum Leopard Rescue: सुतगट्टीतील बिबट्या अखेर जेरबंद

पिंजऱ्यात अडकला : ग्रामस्थांची भीती दूर, प्राणिसंग्रहालयात हलविले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सुतगट्टी गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन खाते काही दिवसांपासून त्याच्या मागावरच होते. त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. अखेर बुधवारी (दि. ५) हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

काही दिवसांपूर्वी एका वाहनचालकाने सुतगट्टी घाटात बिबट्या दिसल्याचा प्रसंग आपल्या मोबाईल फोनमध्ये चित्रित करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या घटनेची माहिती सुतगट्टी ग्रामस्थांनीही वन खात्याला देऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली होती. परिसरातील गस्त वाढवली होती. बिबट्याला पकण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. अखेर बुधवारी बिबट्या वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.

याची माहिती मिळताच वन खात्याच्या पथकाने तातडीने पिंजरा ताब्यात घेऊन तो काकती वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला. त्यानंतर त्याची रवानगी भुतरामहट्टी प्राणिसंग्रहालयात करण्यात आली. बिबट्याला पकडण्यासाठी काकतीचे वनक्षेत्रपाल बी. एल. सनदी, हुक्केरीचे वनक्षेत्रपाल शिवकुमार माळी, डीआरएफओ बसवराज हनगंडी, प्रभू अंगडी, राकेश मुरारी आणि काकती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. बिबट्याच्या स्थलांतरासाठी सुतगट्टी गावानेही सहकार्य केल्याची माहिती वन खात्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT