बेळगाव : शरीर सुखासाठी सातत्याने त्रास देत असल्याच्या रागातून महिलेने तरुणाचा खून केल्याचा प्रकार अथणी तालुक्यातील बाळीगेरी येथे घडला आहे. २१ सप्टेंबररोजी घडलेल्या या खून प्रकरणी अथणी पोलिसांनी सदर महिलेसह तिच्या शाळकरी मित्राला अटक केली आहे.
श्रीदेवी हिंदूसिंग रजपूत (वय ३२, रा. बाळीगेरी, ता. अथणी) व भैरू श्रीमंत पवार (वय ३७, रा. रोणीहाळ, ता. बसवणबागेवाडी, जि. विजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. रणवीर दत्तासिंग रजपूत (वय ३२, मूळ रा. संभाजीनगर, नांदणी रोड जयसिंगपूर, सध्या रा. बाळीगेरी, ता. अथणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रणवीरचे श्रीदेवी हिच्याशी अनैतिक संबंध होते. परंतु, तो शारीरिक सुखासाठी सातत्याने तिच्यावर दबाव आणत होता. या दबावाला ती कंटाळली होती. यातूनच त्याचा काटा काढायचा तिने ठरवले. यासाठी तिने तिच्यासोबत शाळेत शिकलेला मित्र भैरूला पंधरा दिवसांपूर्वी बाळीगेरी येथे बोलावून घेत सर्व प्रकार कथन केला.
पूर्वनियोजन करून खून
उपरोक्त दोघा संशयितांनी रणवीरला संपवायचे पूर्वनियोजन केले. त्यानुसार त्यांनी २१ सप्टेंबर ठरल्यानुसार फासे टाकले. रणवीरच्या आईच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया असल्याने ती मिरजेला गोली होती. त्यामुळे त्यादिवशी घरी रणवीर व त्याची आजी लक्ष्मीबाई आनंदसिंग रजपूत हे दोघेच होते. ठरल्यानुसार रात्रीच्या वेळी भैरूने आपली दुचाकी सुरू होत नसल्याचे सांगत रणवीरला बाहेर बोलावून घेतले. यानंतर येथून जवळच असलेल्या शेतवडीत नेऊन त्याचा गळा आवळून खून केला. तो मृत पावल्याचे लक्षात येताच त्याने मैत्रीण श्रीदेवीला फोनवरून तसे सांगितले व दुचाकी घेऊन फरार झाला.
भावाच्या फिर्यादीनंतर चक्रे फिरली
मृत रणवीरचा भाऊ नारायण आईला शस्त्रक्रियेसाठी मिरजेला घेऊन गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला प्रकाश नामक ओळखीच्या व्यक्तीने फोन केला. रणवीरचा फोन, टॉवेल व चप्पल शेतात पडले असून त्याचे प्रेतही येथेच पडल्याचे सांगितले. त्यानंतर नारायणने अथणी पोलिसांत फिर्याद दाखल केली. तसेच त्याने श्रीदेवी हिच्यावर संशय व्यक्त केला. तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तरीही तिने काहीच सांगण्यास नकार दिल्याने पोलिसांचा तपास रखडला होता. परंतु, कॉल तपशील काढल्यानंतर भैरूचे नाव समोर आले. त्यानंतर दोघांचीही चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांना नायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. अथणीचे उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी, पोलीस निरीक्षक संतोष डी. हळ्ळूर, उपनिरीक्षक गिरीमल्लाप्पा उप्पार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खुनाचा तपास केला.