Drowning Death Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Drowning Death: विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू

मच्छे तलावातील दुर्घटना : अचानक हात भरून आल्याने बुडाला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : श्रीमूर्तीचे विसर्जन करून तलावातून पोहत बाहेर येत असताना अचानक हात भरून आल्याने पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना मच्छे येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. विश्वेश विनोद नायक (वय २०, मूळ रा. हणकोण, जि. कारवार, सध्या रा. नेहरूनगर-मच्छे) मृताचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृतेदह मिळाला.

अधिक माहिती अशी की, विश्वेश हा त्याचे शेजारी दीपक यांच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मच्छे येथील सार्वजनिक तलावाकडे गेला होता. आरती झाल्यानंतर शेजाऱ्याचा मुलगा व विश्वेश हे दोघेजण मूर्ती बुडवण्यासाठी आत गेले. तलावाच्या मध्यभागी मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर दोघेही परतत होते. दोघांनाही चांगले पोहायला येत होते. परंतु, सुमारे १०० फूट आत गेलेल्या विश्वेशचे परत येताना अचानक हात भरून आले व त्याला हात हलवणे कठीण झाले. त्यामुळे तो अचानक बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. विश्वेश हा बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

अडीच तासांनी मृतदेह

विश्वेश अचानक बुडाल्याने बघ्यांनी आरडाओरड सुरू केली. परंतु, तो तलावात मध्यभागी असल्याने काही तरुणांनी तलावात उड्या मारूनही ते त्याला वाचवू शकले नाहीत. माहिती मिळाल्यानंतर वडगाव पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाला पाचारण करून मृतदेहाचा शोध घेण्यात आला. सायंकाळी सात वाजता मृतदेह हाती लागला. वडगाव पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या शवागारात पाठवला. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताचे वडील विनोद विठ्ठल नायक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेची पोलिसांत नोंद झाली असून उपनिरीक्षक जोडट्टी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT